X

जोग यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान

नादब्रह्माची सेवा करताना नियतीने मला तथास्तू म्हटले. गीतरामायण हा माझ्या आयुष्यातील गुरुपुष्य योग होता. त्या काळातील प्रत्येक क्षण सुगंधी होता.

नादब्रह्माची सेवा करताना नियतीने मला तथास्तू म्हटले. गीतरामायण हा माझ्या आयुष्यातील गुरुपुष्य योग होता. त्या काळातील प्रत्येक क्षण सुगंधी होता. जीवनामध्ये भेटलेल्या दिग्गजांनी मला समृद्ध केले, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी गुरुवारी व्यक्त केली.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते जोग यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, आमदार विनोद तावडे, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव संजय भोकरे आणि सांस्कृतिक कार्य संचालक अजय अंबेकर या वेळी उपस्थित होते.

जोग म्हणाले,‘‘ वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी संगीत सेवेची साधना केली त्याचे फळ मिळाले आहे. माझ्या काही रचनांना आपला स्वर देत लता मंगेशकर यांनी त्या रचना अजरामर करून ठेवल्या आहेत. त्यांच्यासमवेत हिंदूी गीतांच्या कार्यक्रमात ‘साँग व्हायोलनिस्ट’ म्हणून काम केले. अशा अद्वितीय गानसम्राज्ञीच्या नावाने धन्य झालेला पुरस्कार नम्रतेने स्वीकारतो.’’

पुरस्कार वापसीचे फॅड सुरू झाल्यामुळे हल्ली पुरस्कार देताना भीती वाटते, असे सांगून विनोद तावडे म्हणाले,‘‘ पुरस्कार परत करणाऱ्यांच्या म्हणण्याची दखल घेतली पाहिजे असे मानणारा मी कार्यकर्ता आहे. पण, त्यांच्या लेखनामध्ये इतकी ताकद आहे की त्यातून ते साध्य होईल. समाजाला बदलण्याची ताकद असलेल्या कलेच्या प्रांतातील व्यक्तींनी अशी हार न मानता जोमाने आपले काम केले पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जोग यांनी आपल्यामधील कलेचे कौशल्य फुलविले. या त्यांच्या कार्याची पोचपावती समाजाने या पुरस्काराच्या माध्यमातून दिली आहे.’’

दिग्गज कलाकारांच्या कला निर्मितीमागची कथा उलगडली गेली पाहिजे. रसिकांना त्यातून अधिक आनंद मिळतो. अशा ज्येष्ठ कलाकारांच्या कलाविष्काराचे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन केले जात आहे. राज्यातील विविध बोली भाषा मरु नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. हे नाही केले तर आपण करंटे ठरू,’’ असेही तावडे यांनी सांगितले.

जन्माला यावं आणि कलाकार व्हावं, अशी भावना व्यक्त करीत सुलोचना चव्हाण यांनी पुण्यात पावती मिळाल्याशिवाय कलाकाराला नावलौकिक मिळत नाही, असे सांगितले. ‘स्वर आले जुळूनी’ हा जोग यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम विभावरी आपटे-जोशी, सावनी दातार-कुलकर्णी, अमेय जोग आणि राजेश दातार यांनी सादर केला. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

First Published on: December 4, 2015 3:28 am
  • Tags: lata-mangeshkar-award, prabhakar-jog,