महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना घरपोच दिल्या जाणाऱ्या वीजबिलाचा भरणा दिलेल्या ठराविक वेळेत केल्यास ग्राहकाला बिलातून अल्पशी सूट दिली जाते. ग्राहकांनी वीजबिल लवकर भरावे, यासाठीचे ते प्रोत्साहन आहे. मात्र, अनेकदा हे वीजबिल ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचतच नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येतात. बिल वेळेत न मिळाल्याने त्यात मिळणारी सूट मिळण्यापासून ग्राहकांचा वंचित राहावे लागते. हा वितरण व्यवस्थेचा दोष की वीजबिलातील सूट मिळूच न देण्यासाठी केलेली व्यवस्था आहे, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
वीजबिल उपलब्ध करून देण्यासाठी व त्याचा भरणा करण्यासाठी महावितरण कंपनीकडून ऑनलाइन पद्धतीचाही पर्याय आहे. याच पद्धतीने संगणकावरच वीजबिलही मिळू शकते. मात्र, या पर्यायांचा सर्वच ग्राहकांकडून वापर होत नाही किंवा अनेकांकडे ही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे या ग्राहकांना घरपोच येणाऱ्या वीजबिलाचीच वाट पाहावी लागते. वीजबिलावर बिल काढल्याची तारीख नोंदवलेली असते. अनेकदा या तारखेनंतर दहा ते बारा दिवसांनी बिल ग्राहकांच्या हाती पडते. या बिलात ते भरण्याची अंतिम तारीख, सूट मिळविण्याची तारीख व अंतिम तारखेनंतर बिल भरल्यास द्याव्या लागणाऱ्या विलंब शुल्काचा उल्लेख असतो, मात्र अनेकदा सूट मिळविण्याच्या तारखेपूर्वी एकदोन दिवस, तर कधीकधी ही तारीख उलटून गेल्यानंतर वीजबिल ग्राहकाला मिळते. त्यामुळे बिलातील सूट मिळवता येत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे.
वीजबिलाचा भरणा न केल्यास तातडीने वीजपुरवठा तोडण्याची कारवाई केली जाते, मात्र मुळात ग्राहकांकडे वीजबिल वेळेत पोहोचविण्यासाठी दक्षता का घेतली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बिल मिळण्याच्या या दिरंगाईबाबत कर्वेनगरमधील वीजग्राहक हर्षदा राजे यांनी ‘लोकसत्ता’कडे त्यांची कैफियत मांडली आहे. वितरण व्यवस्थेच्या गलथान कारभाराचा दंड ग्राहकांना द्यावा लागतो. त्यामुळे वीजबिलातील सूट ही केवळ कागदोपत्रीच असून, त्यातून वीजग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राजे यांनी केला आहे.