पुणे सध्या चर्चेत आहे, ते करोनामुळे. राज्यात करोनानं शिरकाव केला तो पुणे मार्गेच. नंतरच्या काळात करोनानं पुण्यात हातापाय पसरले. त्यामुळे सगळे पुणेकर सध्या घरात बंदिस्त आहेत. पण, लॉकडाउनच्या काळात लोकांचा संयम सुटत असल्याचंही दिसून येत आहे. अशीच एक घटना पुण्यात समोर आली आहे. मोठ्या आवाजात वेबसीरिज पाहणाऱ्यावर एका तरुणावर हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय सुनील त्रिभूवन हा तरुण फुरसुंगी येथील ओम साई पीजी सिद्धी कॉम्पलेक्समध्ये राहतो. त्याच्या शेजारी वकिली करणारे अॅड. जावेद शेख हे राहतात. बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अक्षय त्रिभूवन हा मित्रासोबत लॅपटॉवर वेबसीरिज बघत बसला होता. त्यावेळी जावेदनं अक्षय स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितलं. त्यानंतर आवाज कमी करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या जावेदनं अक्षयला इमारतीच्या खाली बोलावून घेतलं. अक्षय खाली आल्यानंतर जावेदनं त्यांच्यावर धारदार हत्यारानं हल्ला केला. यात अक्षयच्या हातावर पोटावर आणि शरीरावर वार केले. यात अक्षय जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण आणि गाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत जखमी झालेल्या अक्षय त्रिभूवननं हडपसर पोलिसांत अॅड. जावेद शेख याच्याविरूद्ध फिर्यादीवरून दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यात सध्या करोना आणि लॉकडाउनमुळे कडक पोलीस बंदोबस्त आहे. असं असूनही पुण्यात संचारबंदीचं उल्लंघन करण्याचं प्रमाण मोठं आहे. पुण्यात जवळपास ४ हजाराहून अधिक कायदेभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.