कैद्यांच्या पुर्नवसनासाठी काम करणाऱ्या लक्ष्मण गोळे यांना ‘सुकृत’ पुरस्कार प्रदान
गुन्हेगार हा कायमचा गुन्हेगार असतो, ही कल्पना आपण सोडून दिली पाहिजे. मनुष्यशक्तीवर आपला विश्वास असायला हवा. गुन्हेगारांना चांगल्या पद्धतीने वागवून त्यांना योग्य मार्ग दाखविल्यास त्यांचे देखील हृदयपरिवर्तन होऊ शकते. मनगटी शक्तीशिवाय काही होत नाही, असा आपला समज असतो. शक्ती असावी, परंतु ती अंत:करणाची असावी. ती आपल्यामध्ये असते. आपण फक्त त्या शक्तीला जागृत ठेवायला हवे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले.
जाणीव आणि वंचित विकास संस्था तसेच शुभदा-सारस्वत प्रकाशनतर्फे कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारे लक्ष्मण गोळे यांना सुकृत पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी भाई वैद्य बोलत होते. खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव, संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मल्रेचा, शुभदा-सारस्वत प्रकाशनचे जिग्नेश फुरीया, शरद गोगटे, मीना कुल्रेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, चत्राली वाघ, मीनाक्षी नवले यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
भाई वैद्य म्हणाले, आपण समाजनिष्ठ असलो तर कोणत्याही क्षेत्रात राहून आपल्याला काम करता येते. समाजात असे अनेक अज्ञात आधार आहेत, जे समाजाला मुळापासून सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आज आपल्या आजूबाजूला अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ज्या पाहून आपल्याला चिंता वाटते. परंतु समाजात असणाऱ्या समाज सुधारक शक्तींमुळे समाज सुधारेल, याचा विश्वास वाटतो. आपण देखील गरप्रवृत्तींना आळा घालण्यालाठी प्रयत्न करायला हवेत. गुन्हेगारांचे पुनर्वसन महत्त्वाचे असून लक्ष्मण गोळे यांनी केलेले काम विलक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
रघुनाथ जाधव म्हणाले, पोलिस खात्यातील नोकरी म्हणजे समाजसेवेचीच संधी असते. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने काम करायला हवे. कैद्यांचे पुनर्वसन ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. असे कार्य भविष्यात आणखी व्हायला हवे. लक्ष्मण गोळे यांच्यासारखे लोक निर्माण झाले तर पोलिसांची आवश्यकता भासणार नाही.
यावेळी लक्ष्मण गोळे म्हणाले, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हिंसेची आवश्यकता नसते, ही शिकवण मी केलेल्या कृत्यातून मला मिळाली. चांगल्या बदलांना समाज देखील स्वीकारतो. महात्मा गांधीजींच्या विचारांनी माझे आयुष्य बदलले आणि त्यांच्याच विचारांचा प्रसार मी करीत आहे. गुन्हा करणे हा आजार आहे. जोपर्यंत तुम्ही गुन्हेगाराला योग्य मार्ग दाखवित नाही, तोपर्यंत त्या मार्गावरून तो परत येणार नाही. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आदर्श मित्र मंडळाने कार्यक्रमाचे संयोजन केले. देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला कुलकर्णी प्रास्ताविक केले.