आदित्य प्रतिष्ठानतर्फे मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमरतड पं. जसराज यांना यंदाचा लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सव्वा लाख रुपये, सरस्वती चिन्ह, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आदित्य प्रतिष्ठानचा ३३ वा वर्धापनदिन आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून शुक्रवारी (८ एप्रिल) टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पं. जसराज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शंकर अभ्यंकर हे पं. जसराज यांच्याशी संवाद साधणार असून उत्तरार्धात पं. जसराज यांचे शिष्य संजीव अभ्यंकर यांच्या गायनाची मैफल होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त अपर्णा अभ्यंकर यांनी दिली. शंकर अभ्यंकर यांच्या माता-पित्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ २००९ पासून लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार प्रदान केला जात असून यापूर्वी स्वामी वरदानंद भारती, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर, गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, सामाजिक कार्यकर्त्यां सिंधूताई सपकाळ, उषामावशी कुलकर्णी आणि रोहिणी गोडबोले यांना ‘स्त्री-शक्ती गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.