वयाच्या चौथ्या वर्षी हैदराबाद येथे एका फूटपाथजवळून जात होतो. चहा आणि पाव मिळणारे छोटेसे टपरीवजा हॉटेल होते. ‘दिवाना बनाना है तो दिवाना बना दे, वरना कही तकदीर तमाशा ना बना दे’ ही बेगम अख्तर यांच्या गजलची रेकॉर्ड तेथे लागलेली असायची. अख्तरीबाईंच्या त्या आर्त सुरांनी मी संगीताकडे ओढला गेलो. पण, तबलावादक आणि गायक होईन की नाही हे माहीत नसले तरी ‘दिवाना बनाना है’ हे सूर ऐकण्यासाठी मी सतत तेथे फूटपाथसमोर जायचो. ती टपरी हीच माझी पहिली संगीत शाळा होती.. ज्येष्ठ गायक संगीत मरतड पं. जसराज यांनी शुक्रवारी बेगम अख्तर यांच्या स्मृती जागविल्या.
आदित्य प्रतिष्ठानच्या ३३ व्या वर्दापनदिनानिमित्त विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पं. जसराज यांना लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सव्वा लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यानिमित्ताने शंकर अभ्यंकर यांनी पं. जसराज यांच्याशी संवाद साधला. अभ्यंकर यांनी अनुवादित केलेल्या ‘गीतासागर’च्या ११ व्या आवृत्तीचे आणि ‘मुलांसाठी पाठ’ या पुस्तिकेचे प्रकाशन पं. जसराज यांच्या हस्ते झाले. उत्तरार्धात पं. जसराज यांचे शिष्य संजीव अभ्यंकर यांच्या गायनाची मैफल झाली.
‘दस गजकी तान मारनेवाले बहोत है, तुम्हारे गलेमें भगवान है’ असे सनईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खाँ आणि ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बालक्ष्मी यांनी सांगितले होते. त्यांचे म्हणणे खरे करण्याची जबाबदारी भगवंताला घ्यावी लागते, अशा विनयपूर्वक भावना पं. जसराज यांनी व्यक्त केली.