News Flash

विजया मेहता यांनी उलगडला ‘संहिता ते नाटय़प्रयोग’ हा कलाप्रवास

विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ या आत्मकथनपर पुस्तकाला परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

| July 7, 2013 03:00 am

नाटकामध्ये शब्द म्हणजे परब्रह्म असेच अजूनही अनेकांना वाटते. पण, शब्द ही केवळ ‘आऊटलाईन’ आहे. समाजाकडून घेतलेला नाटय़िबदू विविध संस्कारांनी पुन्हा समाजालाच परत करायचा, ही नाटय़कला आहे. हे केवळ गिलावे नसतात. तर, तो एक सुंदर गोफ असतो. गायन असो किंवा चित्र; या कला अमूर्ताकडून अमूर्ताकडे नेणाऱ्या आहेत. पण, मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणारी नाटक ही एकमेव कला आहे, अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी शनिवारी व्यक्त केली.
आपण चहा पितो. कसा असतो चहा?  पाणी, चहा, साखर आणि दूध हे मिश्रण उकळून घेतल्यावर गाळतो. नको असलेला चोथा गाळण्यात आणि अर्क कपात. नको ते गाळून टाकत प्रेक्षकांना अर्क देते ते खरे नाटक.. व्यावहारिक जीवनातील दाखला देत नाटकाची सोपी व्याख्या सांगत ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी ‘संहिता ते नाटय़प्रयोग’ हा कलाप्रवास उलगडला. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भारती विद्यापीठ यांच्यातर्फे विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ या आत्मकथनपर पुस्तकाला परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन या प्रसंगी उपस्थित होते. उत्तरार्धात प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी विजयाबाईंशी संवाद साधला.
‘‘नाटक हा माझ्यासाठी प्रेक्षकांच्या साथीने होणारा सहप्रवास आहे. नाटय़िबदूवर कलांचे आणि संवेदनांचे संस्कार होऊन नाटक आकाराला येते. प्रायोगिक कला असल्यामुळे नाटक प्रत्येकवेळी जमतेच असे नाही. पण, हा प्रवास माझ्यासारखी श्रद्धा असलेले नाटककार, कलाकार आणि प्रेक्षक यांच्याबरोबरचा आहे. काही नाटकं पडलीदेखील. पण, हा प्रवास सुरूच राहिला. एकदा तालमी सुरू झाल्या की दिवाळीच असते. अभिनय, संगीत, प्रकाशयोजना या संस्कारातून रसायन तयार होते. ते रंगमंचावर पसरते आणि त्याचा सुगंध प्रत्येक आसनावर बसलेल्या संवेदनशील मनापर्यंत पोहोचतो,’’ हा अनुभव ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकाच्यानिमित्ताने विजयाबाईंनी मांडला.
नटाने शोध घेणे महत्त्वाचे
नटाने केवळ आपल्या प्रतिमेमध्ये अडकून न राहता भूमिकेचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. दिसायला चांगले आहोत,या भ्रमात राहणारे नट प्रसिद्धी मिळाली की स्वत:च्या प्रेमात पडून मुके-आंधळे आणि बहिरे होतात. ते मला अधिक वेदनादायी वाटते. असे नट मग सहप्रवासी राहात नाहीत. त्यामुळे संवेदनशीलता, कल्पनाशक्ती, ऊर्जा आणि शोध घेण्याची कुवत कशी वाढेल ही प्रशिक्षणाची तत्त्वे आचरणात आणणे महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत विजया मेहता यांनी नवोदितांना मार्गदर्शन केले.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 3:00 am

Web Title: laxmibai tilak reward to vijaya mehata by dr shejwalkar
Next Stories
1 पीएमपीचे सर्व निर्णय ठेकेदार आणि कंपन्यांच्या हितासाठीच
2 गुणवंतांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा छुपा प्रयत्न
3 एमपीएससीच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
Just Now!
X