स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) सराफी दुकाने बंद असल्यामुळे गुरुवारी ग्राहकांचा सोनेखरेदीचा आणखी एक मुहूर्त हुकला. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने लाभते, या समजुतीमुळे या दिवशी पुण्याच्या सराफी बाजारात सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, गुरुवारी पुण्यातील बाजारच बंद असल्यामुळे या उलाढालीवरही पाणी फिरले.
‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ चे अजित गाडगीळ म्हणाले, ‘‘पाडव्याच्या मुहूर्ताला आणि मध्यंतरी सोन्याचे भाव कमी झाल्यानंतर बऱ्याच सोने ग्राहकांनी खरेदी करून घेतली होती. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावरही अनेक ग्राहकांकडून सोने खरेदीबाबत विचारणा झाली, मात्र एलबीटी बंदमुळे दुकान उघडले नाही. ऑनलाइन सोने विक्रीची सोय उपलब्ध आहे. मात्र दुकानात जाऊनच सोने खरेदीचा आनंद घ्यायचा नागरिकांचा कल असल्यामुळे या व्यवस्थेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातल्या त्यात चांदीच्या दागिन्यांना ऑनलाइन चांगला प्रतिसाद मिळतो. गुरुपुष्यामृतालाही ऑनलाइन खरेदी म्हणावी अशी झाली नाही. सातारा, मुंबई येथील दुकाने उघडी असल्यामुळे तिथे मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.’’
फतेचंद रांका म्हणाले, ‘‘या दिवशी पुण्यातील सराफी बाजारात सुमारे सातशे ते आठशे कोटींची उलाढाल होते. मात्र एलबीटीचा तिढा न सुटल्याने ही उलाढाल होऊ शकली नाही. रांका ज्वेलर्सकडून ऑनलाइन सोने विक्रीही सुरू नव्हती. एलबीटीची रक्कम ग्राहकांच्याच खिशातून जाणार असल्यामुळे आमचे ग्राहक आमच्यावर नाराज नाहीत.’’
राजमल लखीचंद ज्वेलर्सचे कर्वे रस्त्यावरील दुकान गुरुवारी सुरू होते. सोन्याचा भाव २६६०० रुपये असतानाही गुरुपुष्यामृतामुळे ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे दुकानाचे व्यवस्थापक सुनील जैन यांनी सांगितले.