आठवडाभरात महाराष्ट्र शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द न केल्यास असहकार आंदोलन करून फक्त १० रुपये कर भरण्यात येईल, अशी भूमिका दि पूना मर्चंट्स चेंबरने घेतली आहे.
राज्य शासनाने लागू केलेल्या एलबीटीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. एलबीटी बाबत चर्चा करून आगामी धोरण ठरवण्यासाठी दि पूना मर्चंट्स  चेंबरने नुकतीच व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी मुंबई, नाशिक, सोलापूर, नगर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, सांगली, मिरज, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर व पुणे जिल्ह्य़ातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘व्ॉटचे उत्पन्न १८ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, तर एलबीटी लागू करण्यात येणार नाही असे आश्वासन शासनाने दिले होते. सध्या व्ॉटच्या माध्यमातून ६० ते ७० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, तरीही शासनाने एलबीटी लागू केला आहे. एलबीटीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे एलबीटी रद्द करण्यात यावा,’ अशी भूमिका दि पूना मर्चंट्सने घेतली आहे.
‘शासनाने एलबीटी रद्द न केल्यास असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून व्यापारी फक्त १० रुपये कर भरतील. शासनाने येत्या आठवडय़ामध्ये याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे,’ असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी सांगितले.