लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या व वैश्विक राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने, लढाऊ  व झुंजार बाण्याने स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जेव्हा सर्व काही संपले आहे, काहीही शिल्लक उरले नाही, कोणतीही आशा व उमेद वाटत नाही, अशी वेळ कोणत्याही माणसाच्या जीवनात येते, तेव्हा त्याला बळ मिळते ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ७९ वर्षांच्या अद्वितीय महायोद्धय़ाकडून!  .

पवारसाहेब हे भारतीय आणि वैश्विक राजकारणातील एक बहुआयामी, प्रगल्भ आणि सुसंस्कृत राजकीय व्यक्तिमत्त्व. कृषिजीवनाशी येथील शेतीमातीशी अतूट नातं असलेलं एक उमदं नेतृत्व म्हणून ते सर्वाना माहिती आहेत. पुरोगामी, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी व महाराष्ट्राची आणि भारताची ओळख अखिल विश्वात पोहोचविण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. संपूर्ण देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार, साहित्य, क्रिडा, शिक्षण, परराष्ट्र धोरण, संरक्षणसिद्धता यांची त्यांना खडान्खडा माहिती असते. मुत्सद्दी राजकीय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे.  या काळाच्या घोंगवत्या वाऱ्यात बरेच लोक सत्तेच्या राजकारणात कोसळले, काही पालापाचोळ्यासारखे उडून गेले. पण आजही पवार साहेबांना भारतीय राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, सभागृहनेते अशी विविध पदे भूषवीत त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध करीत प्रत्येक ठिकाणी ठसा उमटविला. आजपर्यंत सत्तेच्या राजकारणात पवार साहेब सतत केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांनी सत्तेचे राजकारण गतिमान ठेवले, काळालाही आपलेसे केले. सत्ता व राजकारणात त्यांनी अधिकाधिक समाजकारण व विकास यांना महत्त्व दिलं. या सत्तेचा वाटा समाजातल्या दलित, आदिवासी, भटके विमुक्त स्त्रियांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी अत्यंत क्रांतिकारक निर्णय घेतले. त्यांच्या कृतिशील राजकारणाचे व सत्ताकारणाचे मर्म अजूनही कोणाला उलगडता आले नाही. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या मुळाशी भक्कम कृषिजनसंस्कृती, सत्यशोधकीय विचारधारा, छत्रपती शिवराय, फुले -शाहू-आंबेडकर, महर्षी शिंदे, महात्मा गांधी यांच्या विचारांची ठाम बैठक आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी त्यांनी अंगीकारलेली आहे. त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचे सामथ्र्य तसेच अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे बळ त्यांच्या मातोश्री व पुणे जिल्हा लोकल बोर्डच्या पहिल्या एकमेव महिला सदस्या शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले आहे. त्यामुळेच येथील शेती, शेतकरी, कामगार, कष्टकरी व तळागळातील माणसांशी त्यांची नाळ सहजतेने जोडली गेलेली आहे. कुशाग्रबुद्धी व दांडगी स्मरणशक्ती यामुळे वाडय़ा-वस्त्यांवरील खेडय़ापाडय़ांतील सामान्य माणसालाही ते नावानिशी ओळखतात. सलग ५० वर्षांपेक्षा अधिक काळ देशाच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून कार्य करताना निर्णयप्रक्रिया येत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जबरदस्त संघटनकौशल्य, गतिमान प्रशासनावरील पकड, अभ्यासू वृत्ती, शिस्तप्रियता, संयम, विनम्रता, द्रष्टेपणा, तत्त्वनिष्ठता व संघर्षशीलता इ. गुणांमुळे त्यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले. याशिवाय ‘उत्कृष्ट संसद सदस्य‘ हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांना भारत सरकारने ‘पद्म्विभूषण‘या अत्युच्च सन्मानाने गौरविले आहे.

१२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यतील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शरद पवार साहेबांचा ७९ वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण व कृषिमंत्री, जागतिक तक्रार केट परिषदेचे व भारतीय तक्रार केट नियामक मंडळाचे अध्यक्षपद अशा विविध भूमिका त्यांनी अत्यंत सक्षमपणे व समर्थपणे पार पाडताना आपल्या कार्यकर्तृत्वाचा व वेगळेपणाचा ठसा त्यावर उमटविला. त्यांच्या नेतृत्वाची दखल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्यापासून तर भारताचे राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतली आहे. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी तर पवार साहेबांचे बोट धरूनच आपण राजकारणात प्रवेश केला व त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते असतानाही वाजपेयी सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांना सन्मानाने देण्यात आले. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांत सर्वानीच त्यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा देत त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. २०१३ पासून लोकसभेच्या निवडणुकीतून नवोदितांना संधी देत ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. पण आजही समाजविकासासाठी अठरा-अठरा तास अव्याहतपणे कार्य करत आहेत. आदर्श लोकप्रतिनिधीकडे असलेले गुण त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. जनतेचा कायमचा विश्वास संपादन करणे, त्यांच्या सुखदु:खांत सामील होत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यांच्या कायम संपर्कात राहणे, विकासकामांना गती देणे, जनतेशी नम्रतेने व सेवकाप्रमाणे वागणे, विरोधकांशीही संयमाने व सभ्यतेने वागणे. इत्यादी गुणांमुळे त्यांनी विरोधकांचीही मने जिंकली आहेत. त्यामुळे विरोधकही त्यांचे तोंडभरून कौतुक करतात.

मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण, एक गाव एक पाणवठा, हॉर्टिकल्चर क्रांती, हरितक्रांती, धवलक्रांती, सहकाराचं जाळे व वसविलेले औद्योगिक पट्टे व माहिती तंत्रज्ञानाचे जाळे, मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी या सर्वामध्ये साहेबांची धोरणे महत्त्वाची आहेत. असे धोरणात्मक निर्णय घेताना राजकारणात राहूनही त्यांनी आपली संवेदनशीलता व रसिकता शाबूत ठेवली आहे. नवीन कवी, लेखक, संगीतकार, पुस्तके यांची अद्ययावत माहिती त्यांना असते. अगदी ग. दि. माडगूळकर, भीमसेन जोशी, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांपासूनतर नवोदित लेखकांपर्यंत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोककलावंताना व लोककलांना ते वेळोवेळी मदत करतात. महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. याशिवाय पवार सांस्कृतिक न्यास, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या माध्यमातून साहित्य, कला, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रांतील गरजू व गुणवंतांना ते सढळ हाताने मदत करीत आहेत. कवी व दिग्दर्शक रामदास फुटाणे, चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, यांनी साहेबांचे हे गुण वेळोवेळी मान्य केले आहेत.

आदरणीय पवार साहेबांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. सामथ्र्यशाली महाराष्ट्रासाठी अहोरात्र झटले. रात्रंदिन जागरण करून फायलींचा ढिगारा कधीही साठू दिला नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर अनेक दुर्धर आजारातून आणि कठीण प्रसंगातून ते बाहेर पडले व तेवढय़ाच जोमाने ते आजही कार्यरत आहेत. तरुणांनाही लाजवणारा उत्साह आणि आशावाद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेला आहे. शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पीकपद्धती व बी-बियाणे, फळबागायत क्षेत्रांना दिलेले प्राधान्य, महिलांना आरक्षण, सत्तेचे विकेंद्रीकरण,आधुनिक शिक्षण व तंत्रशिक्षणाला दिलेले महत्त्व इत्यादी निर्णयांमुळे त्यांना ‘महाराष्ट्राचा जाणता राजा’ असे म्हणतात. त्यांच्याच पुढाकारातून शेतकऱ्यांची सत्तर हजार कोटींची कर्जे माफ झाली. शेतीचे उत्पन्न वाढले व देश अन्नधान्य उत्पादन व पुरवठय़ामध्ये स्वयंपूर्ण बनला. खेडय़ापाडय़ांतील सामान्य माणसाला ते नावानिशी ओळखतात. सत्तेत असो वा नसो जनहितविरोधी धोरणांना नेहमीच विरोध करतात. उच्चनैतिक मूल्यांचे पालन या जोरावरच त्यांनी अनेक वादळे व आव्हाने सहजतेने पेलली आहेत.

औद्योगिक विकासाखेरीज राज्याचा विकास होऊ  शकत नाही. हे दूरदृष्टीच्या साहेबांनी ओळखले. त्यासाठी औद्योगिक पट्टे व वसाहती वसविल्या आहेत. मोठमोठे प्रकल्प शहरी केंद्रापासून ग्रामीण भागात नेण्यासाठी उद्योजकांना सवलती दिल्या. आय.टी., अ‍ॅटोमोबाईल हब उभारले व त्यामुळेच महाराष्ट्र देशातील एक प्रगत राज्य बनले. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचावी यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला. तसेच सार्वत्रिक शिक्षणाचा सातत्याने पुरस्कार केला.

साहेबांनी नेहमीच सुधारित व आधुनिक शेतीला प्राधान्य दिले. त्या अनुषंगाने कृषी प्रदर्शन, शेतकऱ्यांना सवलती व अनुदाने तसेच विविध आधुनिक शेतीविषयक नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांना माहिती करून दिले. फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्यांच्या जोडीला लघु-उद्योग सुरू करावा अशी नेहमीच त्यांची विचारसरणी असते. ‘विना सहकार नाही उद्धार’ हे सूत्र अंतर्भूत मानून सहकार क्षेत्र जोपासले, वाढवले व आजतागायत टिकवून ठेवले. सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत, जगाच्या स्पर्धेत उतरली पाहिजेत, यासाठी शिक्षण क्षेत्रातही साहेबांनी मोठे योगदान दिले आहे. ई.बी.सी. सवलत, मागासवर्गीय शिष्यवृत्ती या बाबींचे त्यांनी नेहमीच समर्थन केले. एवढेच नव्हे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याच्या धोरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय पवारसाहेबांमुळेच झाला हे सर्वानाच मान्य करावे लागेल.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हा एकूण सर्व शिक्षणाचा गाभा असतो. विविध क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी, विविध व्यवसायांना आणि उच्च शिक्षणातल्या विविध शाखांना जोडणारे मार्ग यातून जातात. माध्यमिक शिक्षणाच्या विकासासाठी रयत शिक्षण संस्थेसारख्या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेचे अध्यक्षपद साहेबांकडे दिले. पुणे जिल्ह्यच्या ग्रामीण भागात गेली ७८ वर्षे शिक्षणाचा ज्ञानरथ चालविणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या उभारणीत घोलपसाहेबांबरोबरच शारदाबाईंचेही योगदान आहे. आदरणीय पवार साहेबही या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. या संस्थेत शिकणाऱ्या बहुजनांच्या मुलांना अत्याधुनिक भौतिक सुविधा आणि उच्च प्रतीचे शिक्षण मिळण्यासाठी साहेब सातत्याने प्रयत्नशील असतात. साहेबांच्या आशीर्वादामुळे मा. अजितदादा पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेचा ७८ वर्षांत मोठा वटवृक्ष झाला आहे.

मुलींच्या मोफत शिक्षणाचा साहेबांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. माध्यमिक शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाची दारे बहुजन समाजासाठी खुली असावीत  पण त्याचवेळी गुणवत्ता जपली जावी, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. साहेबांच्या योगदानामुळेच विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थामंध्ये तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत साक्षात सरस्वतीच पोचली आहे.

राजकारणाबरोबरच तक्रार केट हे देखील साहेबांचे आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर २००५ रोजी ते भारतीय तक्रार केट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय तक्रार केटपरिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे साहेब दुसरे भारतीय आहेत. त्याचबरोबर साहेबांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदीही पुन्हा निवड  झाली आहे.

या कार्यखंडात तक्रार केटबरोबरच इतर सामूहिक आणि वैयक्तिक क्रिडास्पर्धानाही ऊर्जितावस्था देण्याचे काम साहेबांनी केले आहे. बालेवाडी येथे ‘शिव छत्रपती क्रीडा संकुल’ उभारून महाराष्ट्राच्या खेडोपाडी खेळणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूंना अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळण्याची संधी साहेबांमुळे उपलब्ध झाली. कुस्ती, कबड्डी या मातीतील खेळांना व खेळाडूंना त्यांनी संजीवनी व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यातूनच महाराष्ट्र कुस्ती दंगल, इंडियन कबड्डी लीग या स्पर्धा सुरू झाल्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या क्रिडास्पर्धातून राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय पातळीवर खेळाडू आपले कौशल्य दाखवितात. याची मूळ प्रेरणा साहेबांचीच आहे. एकाच क्रीडा संकुलात जलतरण तलाव, मॅटवरील कुस्त्यांचा हॉल, अत्याधुनिक टेबल टेनिस, बॉक्सिंग, ज्युडो-कराटे, बॅडमिंटन आदी एकाच संकुलात बसविण्याची किमया साहेबांनी साधली.

महिलांनाही सामाजिक विकासाच्या निर्णयप्रक्रिया येत सहभागी करून घ्यावे यासाठी साहेबानी १९९३ साली महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले होते. तर २०११ मध्ये हेच आरक्षण ५० टक्के करून आदरणीय पवारसाहेबांनी संपूर्ण जगाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यामुळेच चूल आणि मूल या जाळ्यातून बाहेर येऊन खेडोपाडय़ातील महिलाही गावच्या निर्णयप्रक्रिया येत उतरली आहे.

योगायोग म्हणजे १२ डिसेंबरला आदरणीय साहेबांचा तर १३ डिसेंबरला प्रतिभावहिनींचा वाढदिवस. आदरणीय साहेबांच्या पाठोपाठ जन्म घेऊन सात जन्माच्या सोबतीचे वचन त्या पाळत आहे. सूर्याला सावली देणं जितकं कठीण, तसंच साहेबांसारख्या देदीप्यमान व्यक्तिमत्त्वाला सोबत करणेही कठीण. परंतु याबाबतीत त्यांनी आपले तन-मन-धन साहेबांसाठी वेचले आहेत. साहेबांचे सामथ्र्य आणि प्रतिभावहिनींची साथ यामुळे सफलता सदैव हात जोडून साहेबांसाठी उभी असते.

माहिती तंत्रज्ञानाच्या महाजालात जन्माला आलेल्या आणि सोशल मीडियात रमणाऱ्या माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना पवार साहेबांच्या या भरीव कार्याची जाणीव होत आहे. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांत सोशल मीडियावर त्यांचे सर्वाधिक फॉलोअर्स निर्माण झाले आहेत.  तसेच गुगल सर्चमध्ये सर्वाधिक शोध पवार साहेबांचाच घेतला गेला आहे. म्हणजेच सोशल मीडियावरही पवार साहेबांच्या कार्याची छाप दिसून येत आहे, असे म्हणता येईल. माहिती तंत्रज्ञानाच्या महाजाल उभारणीमध्ये साहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे.

शरद पवार साहेब ही एक व्यक्ती नसून एक विचार आहेत. अठरापगड जातीतील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर दीनदुबळ्यांचा आधार व दूरदृष्टी असलेला लोकनेता, अनेक वादळांना सामोरे जाणारा शांत प्रशांत महासागर आहे. आपला विश्वास व संयम कधीही ढळू न देणारा नेता आहे. राजकीय संस्कृतीचा वारसा तेवढय़ास पावित्र्याने जपणारा कर्मयोगी आहे. पवार साहेब म्हणजे अव्याहत चालणारी चळवळ व विचारधारा आहे. ते भूमिपुत्र आहेत. राजकारणातील कट्टर विरोधकांनीही साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या क्षमतेबद्दल कधीही शंका घेतली नाही. २७ व्या वर्षी आमदार, ३२ व्या वर्षी राज्यमंत्री, ३४ व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री, ५१ व्या वर्षी संरक्षणमंत्री, ६४ व्या वर्षी कृषिमंत्री, ५० वर्षे संसदीय कामकाजाचा अनुभव असा हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

आदरणीय साहेबांबरोबर गेल्या बावीस वर्षांपासून काम करीत असताना त्यांचे कार्य, कतृर्त्व व व्यक्तिमत्त्व यांचा जवळून अनुभव आला. कोठून येत असेल एवढी ऊ र्जा. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर लोक माझे सांगाती. म्हणूनच साहेबांबद्दल ‘कधी न थांबले विश्रांतिस्तव, पाहिले ना वळून मागे‘ असे म्हणता येईल. अशा या भूमिपुत्रास,  लोकनेत्यास व महोयोद्धय़ास वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

 – अ‍ॅड. संदीप कदम मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे |

अधिसभा (सिनेट) सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे