महाविद्यालयीन शिक्षकांना आता नव्या शैक्षणिक वर्षांपासून प्रत्यक्षात अध्यापनाच्या कामात अधिक लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांच्या नियमावलीत सुधारणा केली असून आता शिक्षकांना आठवडय़ाच्या १६ तासांऐवजी आता १८ तास अध्यापन करणे अपेक्षित आहे. त्याचवेळी प्रात्यक्षिकांचे निकषही बदलण्यात आले असून दोन प्रात्यक्षिकांच्या तासिका म्हणजे एक तास असे गृहीत धरण्यात आले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षकांसाठीच्या पात्रता, कार्यभार यांच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. त्याबाबतचा अध्यादेश काही दिवसांपूर्वी आयोगाने काढला. त्यानुसार आता शिक्षकांच्या कार्यभारात आयोगाने बदल केला आहे. शिक्षकांचा प्रत्यक्ष अध्यापनाचा कार्यभार आठवडय़ाला दोन तासांनी वाढवण्यात आला आहे. पूर्वी एका सहायक प्राध्यापकाने एका आठवडय़ाला १६ तास अध्यापन करणे अपेक्षित होते. मात्र नव्या शैक्षणिक वर्षांपासून आठवडय़ाला १८ तास अध्यापन करावे लागणार आहे. अधिक आठवडय़ाला ६ तास हे परीक्षांची कामे, चाचण्या, परिषदा, महाविद्यालयाचे कार्यक्रम यांचे काम करावे लागणार आहे. याचप्रमाणे सहयोगी प्राध्यापकाने १६ तास अध्यापन आणि ६ तास परीक्षांचे काम आणि प्राध्यापकाने १४ तास अध्यापन आणि ६ तास परीक्षांचे काम करणे अपेक्षित आहे. प्रात्यक्षिक परीक्षांच्या प्रमाणातही बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता २ प्रात्यक्षिके म्हणजे १ तास गृहीत धरण्यात येणार आहे. नियमांत बदल करताना आठवडय़ाचे एकूण कामाचे तास मात्र वाढवण्यात आलेले नाहीत. प्रत्येक महाविद्यालयीन शिक्षकाने पूर्वीप्रमाणेच आठवडय़ाला ४० तास महाविद्यालयांत काम करणे किंवा उपस्थित राहणे अपेक्षित आहे.