विजेची बचत करणारे व पर्यावरणपूरक असणारे एलईडी दिवे सवलतीच्या दरात वाटपाची केंद्र शासनाची योजना पुण्यात दिवाळीच्या तोंडावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये पुणे शहरामध्ये एक कोटी एलईडी दिवे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये वीजग्राहकांना महावितरण कंपनीकडून एलईडी दिव्यांच्या शुभ्र प्रकाशाची भेट मिळणार आहे. ३० ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी दिव्यांचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग’ या योजनेअंतर्गत पुण्यामध्ये महावितरण कंपनीकडून एलईडी दिव्यांच्या वाटपाच्या योजनेचे उद्घाटन बुधवारी झाले. या योजनेमध्ये प्रत्येक घरगुती ग्राहकाला सात व्ॉटच्या दहा दिव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. सात व्ॉटचा दिवा हा साध्या ६० व्ॉटच्या दिव्याइतका किंवा ४० व्ॉटच्या टय़ूब एवढाच प्रकाश देतो. पुणे शहरामध्ये महावितरण कंपनीचे सुमारे ११ लाख घरगुती ग्राहक आहेत. या सर्वाना प्रत्येकी १० एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरामध्ये एक कोटी एलईडी दिव्यांच्या वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये रास्ता पेठ विभागातील विभाग, उपविभाग, शाखा सतेच महावितरण कंपनीचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्रामध्ये ३० ऑक्टोबरपासून दिव्यांचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील सर्वच ठिकाणी ही योजना टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. थकबाकी नसलेल्या वीजग्राहकांनी चालू वीजबिलासोबत ओळखपत्र, रहिवासी पुरावा दिल्यानंतर एलईडी दिवे मिळू शकतील. या दिव्यांसाठी तीन वर्षांची ‘वॉरंटी’ असून, या कालावधीत दिवे बदलूनही मिळू शकणार आहेत.
प्रत्येक दिव्याच्या वापरातील वीजबचतीमुळे वार्षिक वीजबिलात सुमारे १८० रुपयांची बचत होऊ शकणार आहे. एलईडी दिव्यांच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये ३०० दशलक्ष युनिट विजेची वार्षिक बचतही होऊ शकणार आहे. पुण्यातील योजनेचे उद्घाटन मुख्य अभियंता रामराव मुंडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक, ईईएसएलचे संचालक अरुणकुमार गुप्ता, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे, महाऊर्जाचे व्यवस्थापक हेमंत पाटील आदींच्या उपस्थितीत झाले. या वेळी १० वीजग्राहकांना प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांचे वाटप करण्यात आले.
चारशे रुपयांचा दिवा शंभर रुपयांना;
रोख किंवा हप्त्यानेही खरेदीची सुविधा
एलईडी दिवे वाटपाच्या योजनेमध्ये देण्यात येणारे दहा दिवे प्रत्येकी सात व्ॉटचे असणार आहेत. बाजारामध्ये या दिव्याची किंमत सुमारे चारशे रुपयांपर्यंत आहे, मात्र योजनेमध्ये हा दिवा शंभर रुपयांना ग्राहकाला देण्यात येणार आहे. हे दिवे एकाच वेळी सर्व रक्कम देऊन खरेदी करता येतील, पण एखाद्या ग्राहकाला एकदाच रोख रक्कम देणे शक्य नसल्यास हप्त्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये दहा दिव्यांपैकी जास्तीत जास्त चार दिवे हे प्रत्येकी १० रुपये आगाऊ रक्कम भरून खरेदी करता येतील. या चार दिव्यांचे उर्वरित प्रत्येकी ९५ रुपये १० हप्त्यांमध्ये देता येतील.