‘राईट टू एज्युकेशन’प्रमाणेच मुलांना ‘राईट टू प्ले’ असायला हवा, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावसकर यांनी भोसरीत व्यक्त केले. प्रेम, करुणा, आत्मीयता, आपुलकी हे भाव आपण विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत, असे सांगून वाढत्या आत्महत्या आणि मुलींचे घटते प्रमाण याविषयी त्यांनी तीव्र चिंताही व्यक्त केली.
पिंपरी पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने गावसकर तसेच निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांचा कार्यगौरव करण्यात आला, तेव्हा त्या बोलत होत्या. महापौर शकुंतला धराडे, ‘लाईफ स्कूल’चे संस्थापक नरेंद्र गोएदानी, सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, प्रशासन अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर आदी उपस्थित होते. सत्कारानंतर गावसकर आणि मेहेंदळे यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
गावसकर म्हणाल्या, आपल्या देशातील मुले खेळतच नाहीत. वास्तविक त्यांनी खेळत मोठे व्हायला हवे. जे लहानपणी मनसोक्त खेळतात, ते उर्वरित आयुष्यात कोणत्याही घटनांना समर्थपणे सामोरे जातात. शिक्षणप्रक्रियेतील अडथळे दूर होण्याची गरज आहे, त्याशिवाय, शैक्षणिक प्रगती होणार नाही. मुलांना गोष्टी ऐकण्यात विलक्षण आनंद वाटतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ उपदेशात्मक पद्धतीने न शिकवता गोष्टी सांगण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा. काय मिळाले नाही, यापेक्षा काय मिळाले याचा विचार करावा. समाजाला व्यसनांचा विळखा आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. महिला आहे म्हणून ही सृष्टी असल्याचे सांगून मेहेंदळे म्हणाल्या, की आपण परीक्षेचे गुलाम झालो आहोत. वास्तविक परीक्षापद्धतीत सुधारणा व्हायला हवी. बंधमुक्त शिक्षण असले पाहिजे. सध्या चालक-पालक, शिक्षक, विद्यार्थी सर्वच बंधनात आहेत. इच्छाशक्ती असल्यास त्यात सुधारणा होऊ शकेल. प्रास्ताविक चेतन घुले यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले आणि अविनाश वाळुंज यांनी केले. निवृत्ती शिंदे यांनी आभार मानले.