विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे प्रतिपादन
लोकशाहीला जे अभिप्रेत नाही, तेच नेमके आपल्याकडे घडते आणि तरीही आपली लोकशाही टिकून आहे, हे जगातील दहावे आश्चर्य मानले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी पिंपरीत व्यक्त केले. गुडघ्यात मेंदू असतात, तेच पुढे जातात, अशी फिरकी घेतानाच पदांना वैधानिक दर्जा नसला तरी दिव्यांच्या मोटारी घेऊन फिरणारे महाराष्ट्रात बरेच जण आहेत, याकडेही त्यांनी या वेळी लक्ष वेधले.
फलटण तालुक्यातून पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्य़ात येऊन स्थायिक झालेल्या रहिवाशांनी स्थापन केलेल्या फलटण लोकसेवा संघ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी डॉ. उत्तम भोईटे यांना ‘फलटण भूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महापौर शकुंतला धराडे, माजी मंत्री शशिकांत शिंदे, डॉ. शरद हर्डीकर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष अनिल शिंदे, संजय निंबाळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक दत्ता साने, कैलास कदम आदी उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले, ‘‘आम्ही राजकारणाच्या बाहेरचे आहोत, यावर कोणाचा विश्वास बसत नाही. सभापती राजकारणाच्या वर असतो. सभापतींनी राजकारण सोडावे, असे माझे तरी मत नाही. केवळ मतांसाठी म्हणून राजकारणात न येता विचाराने आले पाहिजे. कोणत्या पक्षाला मते द्यायची, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. टाकलेले मत विचारानेच टाकले जाते, असे आपल्याला बिलकूल वाटत नाही. कदाचित दहशतीने, पैशाच्या आमिषाने किंवा जाती-धर्माच्या समीकरणाने देखील मते टाकली जातात. लोकशाहीला अभिप्रेत नाही, तेच आपल्याकडे होते.’’