पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगेश साळवे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून रात्री मोटरसायकलवरुन जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिंगोरे परिसराजवळ मंगेश हा दुचाकीवरून जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

या हल्यात त्याच्या पायावर बिबट्याच्या नख्या लागल्या आहेत. जुन्नरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर ही नवीन गोष्ट नाही. जंगल परिसर असल्याने या ठिकाणी अनेकदा जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यांना भक्ष्य मिळत नसल्याने ते रस्त्यावरील नागरिकांवर झडप घालतात. यापूर्वी बिबट्याच्या हल्यात एका महिलेला जीव गमवावा लागला होता. शिवाय परिसरातील बकऱ्या, मेंढ्या यांची देखील बिबट्याने शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे, मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वन विभाग जागे होणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.