बारामती : बारामती तालुक्यातील कण्हेरी-काटेवाडीसह ग्रामीण भागात दहशत निर्माण करणाऱ्या बिबटय़ाला अखेर जेरबंद करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतामध्ये पिंजरा लावून बिबटय़ाला जेरबंद केले.

बारामती तालुक्यातील कण्हेरी, काटेवाडी, ढेकळवाडी, पिंपरी, लिमटेक या गावात गेल्या दोन महिन्यांपासून या बिबटय़ाने मोठी दहशत निर्माण केली होती. बिबटय़ाकडून वाडी-वस्त्यांवरील पाळीव प्राण्यांची शिकार होत होती. बारामती औद्योगिक परिसरात प्रथम सीसीटीव्ही कॅमेरात बिबटय़ा दिसला होता. बिबटय़ाची दहशत वाढत असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू होते.

वन विभागाकडून अनेक ठिकाणी पिंजरे आणि कॅमेरे लावण्यात आले होते. संतोष जाधव यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबटय़ा सापडला. बारामतीचे वनपाल त्रिंबक जराड आणि त्यांच्या पथकाने बिबटय़ाला पकडण्यासाठी अथक प्रयत्न केले. दरम्यान, बिबटय़ाची मादी याच परिसरात फिरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण कायम आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.