नीरावागजमध्ये शेळी, बोकडावर हल्ला; ग्रामस्थ भयभीत

पुणे : बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात बिबटय़ाचा वावर आढळून आला आहे. या भागातील पन्हाळे वस्तीवरील एका शेतकऱ्याची शेळी आणि बोकडावर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. महिनाभरापूर्वी बारामतीतील काटेवाडी भागात बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर नीरावागज येथे पुन्हा बिबटय़ाचा वावर आढळून आला आहे.

दोन दिवसांपूर्वी रात्री पन्हाळे वस्तीवरील सोमनाथ पन्हाळे यांची शेळी आणि बोकडावर हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदन देवकाते, पोलीस पाटील अमित देवकाते, सरपंच यशवंत देवकाते तसेच ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. पन्हाळे यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार या भागात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काटेवाडी परिसरात बिबटय़ाने धुमाकूळ घातला होता. वनविभागाने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि पिंजरा लावला होता.

काटेवाडी भागातून गेल्या काही महिन्यात तीन बिबटय़ांना पकडण्यात आले आहे. त्यामुळे काटेवाडीकरांना दिलासा मिळाला असतानाच नीरावागज परिसरात बिबटय़ाचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.