मागील चार दिवसांपासून पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांमध्ये ‘लेप्टोस्पायरोसिस’ आणि इतर अनेक साथविकारांच्या प्रादुर्भावाची टांगती तलवार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्यावेत, असे आवाहन राज्याच्या साथरोग नियंत्रण विभागाकडून करण्यात येत आहे.

२६ जुलै २००५ ला मुंबईवर ओढवलेल्या पूरसंकटानंतर राज्यात लेप्टोस्पायरोसिसची मोठी साथ येऊन गेली. मागील काही दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली गेलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांतील भीषण चित्र पाहाता लेप्टोस्पायरोसिस आणि इतर साथींचे विकार बळावण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तीव्र ताप, अंगदुखी, विशेषत पाठीचा खालचा भाग आणि पोटऱ्या दुखणे, डोळे लाल होणे आणि असह्य़ डोकेदुखी ही ‘लेप्टोस्पायरोसिस’ची प्रमुख लक्षणे असून या लक्षणांचे रूपांतर कावीळ, धाप लागणे, खोकल्याद्वारे रक्त पडणे, रक्तस्त्राव होणे, लघवी कमी होणे यांमध्ये होण्याचा धोका असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, की पाच ऑगस्टपर्यंत संकलित केलेल्या माहितीनुसार या वर्षांत लेप्टोस्पायरोसिसचे अठ्ठय़ांऐंशी रुग्ण आढळले आहेत. उंदीर, डुक्कर, गाई-म्हशी किंवा कुत्र्यांच्या मूत्रावाटे लेप्टोस्पायरोसिसचे जंतू बाहेर पडतात. शेतीच्या कामात राबणाऱ्या किंवा पुराच्या पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना, विशेषत हात आणि पायावर जखमा असल्यास लेप्टोस्पायरोसिसची लागण होण्याचा धोका संभवतो. या आजारावर उपचार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांना देण्यात आले आहेत. २००५ मधील मुंबईतील पूरपरिस्थितीनंतर ‘लेप्टोस्पायरोसिस’ची साथ आली, त्यामुळे पूरक्षेत्रातील व्यक्तींनी तीव्र ताप, त्वचेवर लाल पुरळ, कावीळ, रक्तस्त्राव, उलटय़ा, अतिसार या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना डॉ. आवटे यांनी केल्या आहेत.

पूर परिस्थिती ओसरताच डेंग्यू, कॉलरा, पचनाचे विकार यांचादेखील धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यापासून बचावासाठी पाणी उकळून पिणे, ताजे आणि गरम, पचण्यास हलके अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करणे, भरपूर पाणी पिणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी, पूर ओसरल्यानंतर स्वच्छ पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. कोणत्याही स्वरूपाचा ताप असेल तरी त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे.

लेप्टोस्पायरोसिस पासून बचावासाठी

* चिखलात शेतीची कामे करणाऱ्यांनी बूट वापरावेत.

* चिखलातील कामानंतर हात-पाय गरम पाण्याने धुवावेत.

* दूषित पाण्यावर वाढलेल्या भाज्या खाऊ नयेत.

* उंदरांची बिळे बुजवावीत, गुरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत.

* तज्ज्ञांच्या सल्ल्याने उंदीर नाशक औषधे वापरावीत.

* हातापायावर जखमा असल्यास जंतूविरोधी औषधे वापरावीत.