पाठय़पुस्तकातील धडे, त्यातील चित्रे आता थ्रीडी स्वरूपात किंवा व्हिडीओ स्वरूपात विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहेत. एका तंत्रस्नेही शिक्षकाने उपलब्ध असलेली यंत्रणा आणि अॅप वापरून आभासी पाठय़पुस्तके तयार केली आहेत.
तंत्रस्नेही शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या शिक्षण विभागाच्या योजनेला शिक्षकांचा प्रतिसादही मिळू लागला आहे. अनेक शिक्षक असलेल्या प्रणालींचा शिकवण्यासाठी प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक आहेत रणजित डिसले हे शिक्षक. विद्यार्थ्यांना औत्सुक्य वाटावे या उद्देशाने पहिली ते चौथीची परिसर अभ्यास, मराठीची नवी पाठय़पुस्तके बालभारतीने आकर्षक स्वरूपात तयार केली. त्याच्या पुढे पाऊल टाकत जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या डिसले यांनी या पुस्तकांना जिवंतपणा दिला आहे. पुस्तकात उपलब्ध असलेला मजकूर, चित्रे यांचाच वापर करून डिसले यांनी आभासी पुस्तके तयार केली आहेत. ‘ऑग्युमेंटेड रिअॅलिटी’ या तंत्रज्ञानाचा वापर करून डिसले यांनी ही पुस्तके तयार केली आहेत.
डिसले यांनी पुस्तकातील मजकुराचे रुपांतर चित्र, आकृत्या यांमध्ये केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘एआर अॅप्स’ म्हणजेच  ‘ऑग्युमेंटेड रिअॅलिटी’ प्रणालीचा उपयोग करून या चित्रांतून आभासी पुस्तक तयार होते. पुस्तकांतील आशय आभासी स्वरूपांत अनुभवण्यासाठी एआर अॅप सुरू करून त्यावर मोबाईल धरावा. असलेली चित्रे या अॅपच्या माध्यमातून स्कॅन होतात आणि त्या चित्रांचे रुपांतर लगेच थ्रीडी आणि व्हिडीओ स्वरूपांत तयार होऊन मोबाईलवर दिसू लागते. प्रत्येक पानांतील आशयानुसार ‘अॅनिमेशन’, ऑडिओ अशा घटकांचा समावेश करून ही आभासी पुस्तके तयार करण्यात आली आहेत. स्वयंमूल्यमापनासाठी या आभासी पुस्तकांमध्ये प्रश्नपत्रिकेचाही समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निकालाचा इ-मेल वापरणाऱ्याला लगेच मिळू शकतो. ज्या गावांमध्ये वीज नसते अथवा संगणक सुविधा नाहीत अशा ठिकाणी या पुस्तकांचा उपयोग होऊ शकेल, असे डिसले यांनी सांगितले.
राज्यात सध्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवणाऱ्या २२ हजारांहून अधिक शिक्षकांनी तंत्रस्नेही शिक्षक म्हणून नोंदणी केली आहे. शहरी भागांपेक्षाही ग्रामीण भागांतील शिक्षकांची संख्या या उपक्रमांत अधिक दिसत आहे.