‘एलजीबीटीक्यूआय’ यांच्यासह सर्वाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टॅगलाइन बदलली

पुणे : ‘मिळून साऱ्या जणी’ यामध्ये सारे जण तर येतातच. पण, ‘ते’ ही येतात असे म्हणत आता ‘एलजीबीटीक्यूआय’ यांच्यासह सर्वाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिळून साऱ्या जणी’ची टॅगलाइन बदलली. ‘ती’ आणि ‘तो’ यांच्यापलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वत:शी आणि परस्परांशी नव्याने संवाद व्हावा यासाठी.

स्त्री आणि पुरुष यांच्यातील समानतेचा विचार मांडणाऱ्या विद्या बाळ यांनी ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाची स्थापना केली. पण, ‘मिळून साऱ्या जणी’ असे म्हणताना त्यामध्ये सारे जणही अपेक्षित होते. त्यानुसार गेल्या तीन दशकांपासून ‘मिळून साऱ्या जणी’ काम करीत आहे. आता ‘ती’ आणि ‘तो’ यांच्यापलीकडे ‘ते’ही येतात. त्यांनाही या चळवळीत सामावून घेतले पाहिजे, अशी भूमिका विद्या बाळ यांनी मांडली. या संकल्पनेचे सर्वानी स्वागत केले आणि ३० वर्षांनंतर ‘मिळून साऱ्या जणी’ची ‘टॅगलाइन’ बदलण्यात आली आहे.  ‘आम्ही सर्व आमची एकजूट’ असे म्हणत साऱ्यांनी विद्याताई यांनी सुचविलेला हा बदल अगदी आनंदाने स्वीकारला. सर्व परिवर्तनवादी संस्था आणि संघटनांमध्ये समंजस साकव उभारण्याचे काम करणाऱ्या विद्याताई यांनी याच कार्यासाठी आयुष्य वेचले, अशी माहिती ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक गीताली वि. म. यांनी दिली.  अनेक कार्यकर्ते उन्हातान्हात काम करतात. पण, त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, याची विद्याताई यांना नेहमी खंत वाटत असे, असेही गीताली यांनी सांगितले.

पुरस्कार मी स्वीकारला

विद्या बाळ यांना शिरीष पै पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील अखेरचा पुरस्कार लाभला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विद्याताई हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकल्या नाहीत. पण, शिरीष पै यांच्या नावाचा हा पुरस्कार महत्त्वाचा असल्याने त्यांच्यावतीने मी आणि साधना दधिच यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, अशी आठवण गीताली वि. म. यांनी सांगितली.