सरकार असहिष्णू झाले तर न्यायालयात दाद मागता येते. झुंडशाही असहिष्णू झाली तर न्यायालयात दाद मागता येत नाही. त्यामुळे उदारमतवादाचा स्वीकार हाच विचार स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी केले.  लेखकांचे आणि वाचकांचे स्वातंत्र्य बरोबर चालले पाहिजे. ती उदारता नियमांनी ठरवता येत नाही, तर मनातून आणावी लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते न्या. नरेंद्र चपळगावकर यांना ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ‘स्वातंत्र्य : लेखकांचे आणि वाचकांचे’ या विषयावर चपळगावकर बोलत होते. डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे या वेळी उपस्थित होते.

चपळगावकर म्हणाले, सर्व जगामध्ये असहिष्णुता आहे. अशा वेळी विचार स्वातंत्र्याचे महत्त्व सांगावे लागते. माणसाच्या मनातील ऊर्मी हुकूमशाही व्यवस्था दाबून ठेवू शकत नाही. ज्ञानाचे शत्रू मुजोर सत्तेवर येतात तेव्हा काय होते हे आपण पाहिले.  सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ या कलाकृतीवर ती भारतामध्ये येण्याआधीच बंदी घालण्यात आली होती. र्सवकष बनण्याचा सत्तेचा प्रयत्न असतो. अशा काळात विचार स्वातंत्र्याचा लढा त्या लेखकाला एकटय़ालाच लढावा लागतो.

श्रीगमांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नसली तरी ‘माणूस’ची भेट झाली. निर्भय आणि उदारमतवादी पत्रकारितेला श्रीभाऊंनी विधायक कृतिशीलतेची जोड दिली, अशा शब्दांत माजगावकर यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.  ढेरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्रात विचारवंतांची वानवा : महाराष्ट्रात सध्या विचारवंतांची वानवा आहे. मराठी भाषेला वैचारिक वाङ्मयाची दीर्घ परंपरा आहे. मात्र, सध्या नाव घेण्याजोगा विचारवंत दिसत नाही याचे नवल आणि वैषम्य वाटते, अशी खंत डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली. सगळंच भ्रष्ट आणि गढूळ होत असताना राजकारण्यांना समजावून सांगणाऱ्या विचारवंतांची आवश्यकता आहे. मराठवाडय़ातील विस्मरणात चाललेल्या व्यक्तींचा मूल्यमापनात्मक परिचय करून देताना चपळगावकर यांनी  वैचारिक परंपरा किती समृद्ध आणि उदारमतवादी आहे याचे दर्शन आपल्या लेखनातून घडविले आहे, असे रसाळ यांनी सांगितले.