स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना फटका

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मुलाच्या विवाहाला बापट संचालक असलेल्या महात्मा फुले वाचनालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश असल्यामुळे तेथील अभ्यासिकेलाच सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री बापट यांच्या घरातील सोहळ्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाही विवाहसोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यातूनच सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फटका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना बसला असून विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विवाहानिमित्त अभ्यासिका बंद ठेवण्याचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांचे पुत्र गौरव याच्या विवाहसोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध संस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. या सर्वाची सरबराई करण्याची जबाबादारी पालकमंत्री संचालक असलेल्या महात्मा फुले संग्रहलयातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांचा राबता शाही सोहळ्यात असल्यामुळेच अभ्यासिका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला जागा मिळावी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा यादृष्टीने महात्मा फुले संग्रहालयातील अभ्यासिका ठरावीक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना दिली जाते. ट्रस्टच्या माध्यमातून या अभ्यासिकेचे नियंत्रण केले जाते. सध्या दोनशे विद्यार्थी या अभ्यासिकेत येतात. सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत ही अभ्यासिका सुरू असते. मात्र बुधवारी अभ्यासिका बंद ठेवण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. त्यासाठी कोणतेही कारण संबंधितांकडून प्रारंभी देण्यात आले नाही. मात्र यासंदर्भात चौकशी केल्यानंतर बापट   यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यानिमित्ताने अभ्यासिका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाब पुढे आली.

संबंधितांकडे याबाबत विचारणा केली असता या माहितीला दुजोरा देण्यात आला. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांना विवाहसोहळ्यातील काही जबाबदारी दिल्याचेही सांगण्यात आले.  बापट हे संचालक मंडळावर आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अभ्यासिकेसाठी पाचशे रुपये प्रती महिना आणि पाचशे रुपये अनामत रक्कम विद्यार्थ्यांकडून घेण्यात येते. यापूर्वीही कोणतेही कारण न देता अभ्यासिका बंद ठेवण्यात आली होती. त्याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी वर्गाकडून माहिती दिली जात नाही. शासकीय सुटय़ा या अभ्यासिकेला असतात. येत्या काही दिवसांमध्ये स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे त्याची विद्यार्थ्यांकडून तयारी सुरु आहे. मात्र या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्याबाबत विद्यार्थ्यांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेली ही अभ्यासिकेशी संबंधित वर्गाला विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक करण्याचा आणि त्यामुळे अभ्यासिका बंद ठेवण्याचा निर्णय घेता येऊ शकतो का, यावर चर्चा सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे हा निर्णय वादग्रस्त ठरणार असल्याचे दिसत आहे.