पोलिसांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे एलआयसी विम्याचा हप्ता पगारातून कपात करून भरण्यास उशीर होत आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील एलआयसी विमाधारक पोलीस कर्मचाऱ्यांचे पगारातून हप्ते कपात करण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे आता पॉलिसीधाकर पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत: जाऊन हप्ते भरावेत, असा आदेश देण्यात आला आहे. या आदेशामुळे विमाधारक पोलीस कर्मचारी हवालदील झाले आहेत.
पुणे शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे पगार एका निश्चित तारखेला होत नाहीत. त्यामुळे पगारातून एलआयसीच्या हप्त्याची रक्कम कपात करून घेण्यास विलंब होतो. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या वेतनातून एलआयसीचा हप्ता कपात करण्यता येणार नाही. यापुढे एलआयसी विमाधारकपोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत: एलआयसीच्या कार्यालयात जाऊन हप्ते भरावेत, असा आदेश नुकताच काढण्यात आला आहे. या आदेशामुळे विमाधारकपोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. पोलिसांना सुट्टय़ा फारच कमी मिळतात, तर कधी-कधी साप्ताहिक सुट्टय़ा देखील रद्द केल्या जातात. पोलिसांना बारा तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे हप्ते भरण्यास कधी वेळ मिळणार, असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पगारातून एलआयसी विमाधारक पोलिसांचा हप्ता कपात करून घ्यावा, अशी मागणी पोलिसांकडून केली जात आहे.