किरकोळ कारणावरून मित्राला पेटवून देऊन खून केला. घटनेनंतर तो फरार झाला. पण, पोलीस त्याचा माग काढतच होते. तब्बल सोळा वर्षे फरार असताना तो पोलिसांना एका नातेवाईकाकडे मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू केला. पण, सोळा वर्षांपूर्वीचा गुन्हा असल्याने त्यातील फिर्यादी असलेले पोलीस मयत झाले. तरीही सरकार पक्षाने योग्य पुरावे न्यायालयापुढे सादर केले. खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी त्याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
डाल्या ऊर्फ दादू ऊर्फ गजराज बिगारी (वय ३२, रा. खडकी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या घटनेत मंगेश विजय पिल्ले (वय ३०, रा. जनतानगर, नवी खडकी) याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. डाल्या आणि मंगेश हे खडकी येथील एका ठेकेदाराकडे कामाला होते.  एक जानेवारी १९९६ रोजी झोपण्यावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी सकाळी डाल्याने मंगेशच्या अंगावर बादलीतून आणलेले रॅकेल टाकून पेटवून दिले. यामध्ये मंगेश हा गंभीर जखमी झाला होता. त्याला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. या ठिकाणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी अनिरुद्ध ससाणे यांनी त्याचा मृत्युपूर्व जबाब घेतला. त्यामध्ये त्याने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचे सांगितले होते. त्याचा काही दिवसांनी उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.
घटना घडलेल्या दिवसांपासून डाल्या हा पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास करून त्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पोलीस त्याच्या मागावरच होते. तो तब्बल सोळा वर्षांनी एका नातेवाईकाकडे पोलिसांना मिळाला. त्याच्यावर खटला चालविण्यात आला. सरकारी वकील लक्ष्मण मैंदाड यांनी पाच साक्षीदार तपासले. सोळा वर्षांपूर्वीचे साक्षीदार गोळा करण्यात अडचणी आल्या. अ‍ॅड. मैंदाड यांनी उच्च न्यायालयाच्या खटल्याचे दाखले देत आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. ती मान्य करत न्यायालयाने डाल्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.