बँकाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे आकुर्डी येथील कार्यालयामध्ये कामगारांची गर्दी

सेवानिवृत्तांचे ज्या बँकेत खाते आहे त्याच बँकेने जीवन प्रमाण पत्र (हयातीचा दाखला) देणे बंधनकारक असताना बँका खातेदारांना जीवन प्रमाणपत्र देत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बँकाच्या अशा अडवणुकीच्या धोरणामुळे आकुर्डी येथील कार्यालयामध्ये रोजच गर्दी होत असून जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना दोन-दोन तास रांगेत उभे रहावे लागत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे भविष्य निर्वाह निधी कार्यालय बँकांना जीवन प्रमाणपत्र करुन देण्यासाठी प्रत्येक वर्षी कमिशन देत असतानाही बँका खातेदारांना सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे.

औद्योगिक कंपन्यांमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधीचे अंशदान भरणाऱ्या कामगारांना निवृत्तिवेतन दिले जाते. कामगारांचे निवृत्तिवेतन भविष्य निधी कार्यालयाबरोबर करार झालेल्या बँकेमध्ये जमा होते. नोव्हेंबर २०१६ पासून निवृत्तिवेतन घेण्यासाठी हयात असल्याचा पुरावा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन आधार कार्डचा क्रमांक सांगून आधार कार्ड जोडणी केल्यानंतर खातेदारांना जीवन प्रमाणपत्र दिले जाते. बँका जीवन प्रमाणपत्र देत नसल्याने आकुर्डी येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची रोज गर्दी होत आहे. खेड, जुन्नर, लवासा, मुळशी, लोणावळा आदी भागातून सेवानिवृत्त कामगार जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी रांगेत उभे असतात. आकुर्डी येथील कार्यालयात सुविधांचाही अभाव आहे.  त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.

जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून बँकांना कमिशन दिले जात असताना खातेदारांची अडवणूक केली जाते. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सात बँकांबरोबर करार केला असून या बँकांमध्ये निवृत्तिवेतन जमा केले जाते.

बँकेमध्ये जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी गेल्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांनी आकुर्डी येथील पीएफ कार्यालयात जाण्यास सांगितले. एक तास रांगेत उभे राहावे लागले.

गणपत शिंदे, सेवानिवृत्त कामगार, पवनमावळ

बँकांनी खातेदारांना जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून बँकांना कमिशन दिले जाते. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांचे बँकांनीच जीवन प्रमाणपत्र द्यावे. ज्या बँका अशा सेवा देत नाहीत त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

अमिताभ प्रकाश, आयुक्त, भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालय पुणे