महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच परस्पर दिलेल्या चार शाखांच्या मान्यतेवर वादळी चर्चा झाल्यानंतर रविवारी परिषदेच्या कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केले. मात्र, आगामी निवडणुकीत नव्हे तर २०२१ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये या आजीव सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे.
‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘मसाप’चा शाखा विस्तार कार्यक्रम’ हे वृत्त प्रकाशित करून ‘लोकसत्ता’ने यावर प्रकाशझोत टाकला होता. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपल्याच हाती सत्तेची सूत्रे राहावीत या उद्देशातून भोसरी, नातेपुते (जि. सोलापूर), बेलापूर (जि. नगर) आणि नाशिक रोड या चार नव्या शाखांना परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर मान्यता दिली होती. मात्र, या शाखांच्या मान्यतेसंदंर्भातील ठराव रविवारी झालेल्या परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये ठेवण्यात आला. या शाखांच्या मान्यतेचा ठराव रेटून नेण्याला जिल्हा प्रतिनिधींनी आक्षेप घेतला.
परिषदेच्या घटनेनुसार नवी शाखा सुरू करताना जिल्हा प्रतिनिधीची संमती घेतली जावी असे संकेत आहेत. त्यानुसार नाशिक रोड शाखेसाठी प्रकाश होळकर आणि बेलापूर शाखेसाठी प्रा. सु. प्र. कुलकर्णी या जिल्हा प्रतिनिधींची मान्यता घेण्यात आली होती. मात्र, नातेपुते आणि भोसरी या शाखांसदर्भात आम्हाला अंधारात ठेवण्यात आला असल्याचा आक्षेप सोलापूर आणि पुणे जिल्हा प्रतिनिधींनी घेतला. त्यामुळे या विषयावर वादळी चर्चा झाली. ‘या शाखांना मान्यता न दिल्यास त्या शाखांचे प्रमुख न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील’, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र, परिषदेचे कामकाज घटनेनुसार व्हावे या मुद्दय़ावर जिल्हा प्रतिनिधी ठाम राहिले. अखेरीस आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार प्रदान न करता या शाखांना मान्यता देण्याच्या मुद्दय़ावर एकमत झाले.
परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक ‘खेळीमेळी’च्या वातावरणात पार पडली असून चार शाखांना मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. या नव्या मान्यतेमुळे परिषदेच्या शाखांची संख्या ७३ होत असून आजीव सभासदांच्या संख्येमध्ये अडीचशे जणांची भर पडली आहे. आमच्या कार्यकारिणीने चार वर्षांत १३ नव्या शाखा सुरू केल्या आहेत. परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांचा मेळावा लवकरच आटपाडी येथे घेण्यात येणार असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.