25 October 2020

News Flash

प्रेरणा : सत्कार्याच्या पथावर..

या कार्याची माहिती वाचून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.

आपली नोकरी वा उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक जण काही ना काही सामाजिक काम अगदी मनापासून करत असतात. त्यांच्या या कार्याची माहिती वाचून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.

नोकरी, व्यवसायाच्या उमेदीच्या काळातच अनेक जण आपली सेकंड इनिंग कशी सत्कारणी लावता येईल, याचा विचार करत असतात. काही चांगले काम हातून घडावे म्हणून अशी मंडळी प्रयत्नशील असतात. हा मार्ग काहींना अगदी विनासायास सापडतो. सत्कर्माच्या पथावर जाण्याची इच्छा मनी बाळगत असतानाच अशाच प्रकारचा मार्ग सापडलेले आणि त्या पथावर मनापासून प्रवास करीत अनेकांसाठी प्रेरणा ठरलेले एक नाव म्हणजे सुरेश परांजपे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या सेवेतून २०१२ साली निवृत्त झाल्यानंतर परांजपे यांना एका मित्राबरोबर सासवड येथील दिव्यांग मुलांच्या शाळेत जाण्याचा योग आला. तेथे लावलेले शाळेच्या नियोजित इमारतीच्या आराखडय़ाचे छायाचित्र पाहून, ही इमारत प्रत्यक्षात उभी राहावी यासाठी आपणही प्रयत्न करावा असा विचार तेव्हा परांजपे यांच्या मनात आला. त्यांनी लगेच त्यासाठीची कार्यवाहीदेखील सुरु केली. या शाळेसाठी देणग्या मिळवून द्याव्यात असे त्यांनी ठरवले. आपली प्रेरणा आणि शाळेची इमारत यांना मूर्त रुप देण्याच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील सेकंड इनिंगला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

लोकांकडून उपेक्षा, टीका, घरच्यांकडून प्रतिकूल प्रतिसाद या सगळ्यांतून त्यांनी सुरु केलेल्या या कामात त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि आत्मविश्वास यांचा विजय झाला. परांजपे यांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागले. रोज एक नातेवाईक, स्नेही, मित्र, बँकेतील माजी सहकारी यांच्याशी संपर्क करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. एक दिवस बँकेच्या उच्चपदस्थ्य अधिकाऱ्याच्या कानावर त्यांचे काम पोहोचले. त्यांनी परांजपे यांच्याशी भेट घेण्याचा मानस प्रत्यक्षात आणला. अधिकाऱ्याची आणि परांजपे यांची भेट झाली आणि या भेटीतून ५ हजारांची देणगी त्यांना या शाळेसाठी मिळाली. पुढच्या दोन-तीन महिन्यांतच त्यांनी दोन लाखांचा निधी उभा केला.

परांजपे यांचे संपर्कक्षेत्र वाढत होते. ज्यांना ते भेटले होते, त्यांनी तर परांजपे यांच्या कार्याला प्रोत्साहित केलेच, पण त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या गाठीभेटीदेखील करुन देण्यास सुरुवात केली. समाजासाठी योगदान देण्याची ऊर्मी रक्तातच असल्यामुळे त्यांच्या या कार्याला चार वर्षांनंतरच्या अथक परिश्रमांनंतर यश आले आणि शाळेची छायाचित्रातील इमारत प्रत्यक्षात आकारास आली. याशिवाय देगणीच्या माध्यमातून खेळणी, पाण्याच्या टाक्या, बसण्यासाठी बाक, पंखे, शिलाई मशिन, फ्रिज, नित्योपयोगी अनेक वस्तूदेखील त्यांनी शाळेस मिळवून दिल्या. त्यामुळे या शाळेत आजच्या घडीला अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विनाअनुदानितच्या प्रश्नावरील एक उत्तर म्हणून परांजपे यांची ध्येयनिश्चिती आज अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवते आहे. त्यानंतर या शाळेशिवायही त्यांनी अनेक संस्थांना लाखांच्या घरात आर्थिक मदत मिळवून दिली आहे. उदारहस्ते देणग्या देणाऱ्यांपर्यंत पोहोचणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांची देणगी योग्य ठिकाणी दिली जाते आहे याची खात्री देणे,असे अवघड कार्य परांजपे करीत आहेत.

या त्यांच्या सामाजिक कार्याचाच एक भाग म्हणजे बँक व्यवस्थापनाने नाकारलेली कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके चर्चेद्वारे मंजूर करुन घेतली, यामुळे याचा फायदा ६३ बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे. निवृत्त लोकांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करीत त्यांना सल्ला देण्याचे कार्यदेखील परांजपे सध्या करीत आहेत. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर्षांनुवर्षे व्यवहार होत नसलेल्या खात्यातील रक्कम संबंधित खातेदाराला परत मिळावी यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा त्यांच्या सामाजिक कार्याचा आणखी एक पैलू. याद्वारे पाठपुरावा करुन अनेकांना त्यांची हक्काची रक्कम परांजपे यांनी परत मिळवून दिली आहे. याशिवाय नेत्रदान या विषयावर जनजागृती हादेखील त्यांच्या समाजकार्याचा एक भाग आहे. त्यांच्या कार्यात जर सहभागी व्हायचे असेल तर ९८५०७१७९१६ या क्रमांकावर परांजपे यांच्याशी संपर्क साधता येईल.

तन, मन, धन असे सर्वार्थाने एखादे सामाजिक कार्य करीत असताना त्यामध्ये कल्पकतेचा वापर करुन सेवाकार्य करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे कार्य अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

shriram.oak@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 2:24 am

Web Title: life story of suresh paranjape
Next Stories
1 राज्यातील दस्तनोंदणी, आधार केंद्र ठप्प
2 संगणक अभियंता महिलेची इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
3 वाकडमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणारी इराणी टोळी पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X