ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांची भावना

पुणे : मला बसने प्रवास करायला आवडते. प्रवासात साधे लोक भेटतात. त्यांच्या सवयी निरखून घेता येतात. त्यांचे बोलणे मी कान देऊन ऐकत असते. सामान्य माणसे हीच माझ्या कामाची सामग्री असते, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी मंगळवारी व्यक्त केली. मला नटांना समजावून सांगता येते. पण, अभिनेत्री म्हणून मी सुमार आहे. हे लवकर समजल्यामुळे मी लेखन, दिग्दर्शनाकडे वळले, असेही त्यांनी सांगितले. क्रीडामहर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानतर्फे सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते परांजपे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय महिला क्रिकेट संघातील देविका वैद्य, गायक राहुल देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब साने आणि सचिव सुनील नेवरेकर या वेळी उपस्थित होते. आरती दातार यांनी पुरस्कारप्राप्त तिघांशी संवाद साधला. त्या प्रसंगी परांजपे बोलत होत्या.

परांजपे म्हणाल्या, माझे आजोबा रँग्लर परांजपे हे पुण्याचे भूषण होते. आई शकुंतला परांजपे ही त्या काळात टेनिस खेळायची. केंब्रिज विद्यपीठात शिक्षण घेतल्यानंतर तिने रशियन माणसाशी लग्न केले. दोन वर्षांमध्ये घटस्फोट झाला आणि दोन वर्षांच्या मुलीला म्हणजे मला घेऊन ती पुण्यात आली. तिच्या आग्रहामुळे संस्कृत पाठांतर केले. माझे उच्चार स्पष्ट होण्यासाठी उपयोग झाला आणि मराठीत बोलायची सवय लागली.  सध्या मी मुलांसाठी आयुर्वेदाची महती सांगणारी ‘आयुष्यमान भव’ ही दहा भागांची मालिका करते आहे.

नाईक निंबाळकर म्हणाले,खो-खो, कबड्डी हे देशी खेळ व्यावसायिक होत नाहीत, तोपर्यंत मुले त्याकडे आकर्षित होणार नाहीत.

देशपांडे म्हणाले, ज्येष्ठ गायक भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि मल्लिकार्जुन मन्सूर हे खऱ्या अर्थाने पंडित होते. मी पंडित नाही तर सुरांचा साधक आहे.

आत्मचरित्र हा एकतर्फी डाव

लाटलेले खूप पापड वाटावेत म्हणून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेल्या सूचनेनुसार ‘सय-माझा कलाप्रवास’ हे सदर लेखन केले, असे सई परांजपे यांनी सांगितले. आत्मचरित्राविषयी मी साशंक आहे. माझी बाजू आहे तशी मी ज्याच्याविषयी लिहिते त्याचीही बाजू असू शकते. त्यामुळे आत्मचरित्र हा एकतर्फी डाव होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.