पर्यटकांचा हिरमोड; छोटय़ा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील लायन्स पॉईंट गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. या परिसरातील दोन गावांतील ग्रामस्थांच्या वादामुळे लायन्स पॉईंटवरील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. लायन्स  पॉईंट बंद असल्यामुळे वर्षांविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत असून या भागातील छोटय़ा व्यावसायिकांची गेल्या महिन्याभरापासून उपासमार सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून आतवण आणि कुरवंडे गावातील नागरिकांमध्ये वाद सुरू आहेत. या वादामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने वन विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात लायन्स पॉईंटवरील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी संजय मारणे आणि सोमनाथ ताकवले यांनी दिली.

लोणावळा शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर वन विभागाच्या हद्दीत लायन्स पॉईंट निसर्गरम्य ठिकाण आहे. बारामाही थंड हवा आणि चहुबाजूला पसरलेले धुके हे लायन्स पॉईंटचे वैशिष्टय़ आहे. २०११ मध्ये वन विभागाकडून आतवन संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आतवण गावातील १५ जणांना तसेच कुरवंडे गावातील पाचजणांना दुकाने सुरू करण्याची परवानगी  देण्यात आली होती.

वन समितीकडून या भागात वाहनतळ सुरू करण्यात आला. वाहनतळातून मिळणारा निधी या भागातील विकासकामांसाठी वापरला जातो. गेल्या काही वर्षांपासून लायन्स पॉईंट पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत गेली. त्यामुळे लोणावळा परिसरातील अनेकांनी या भागात तात्पुरत्या स्वरुपात बेकायदा दुकाने थाटली. या भागात येणाऱ्या पर्यटकांना जादा दराने खाद्यपदार्थ तसेच अन्य वस्तूंची विक्री करण्याचे गैरप्रकार सुरू झाले. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या काणाडोळ्यामुळे गैरप्रकारांमध्ये वाढ होत गेली. या भागात अवैध धंदे     सुरू झाले. बेकायदा हुक्का पार्लर तसेच मद्यविक्री सुरू करण्यात आली. या भागातील गैरप्रकारांमुळे लायन्स पॉईंट बदनाम झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आतवण भागातील आदिवासी, डोंगरी भागातील छोटे व्यावसायिक, फेरीवाले या भागात कणीस, चहा, वडापाव, भजी अशा खाद्यपदार्थाची विक्री करतात. गेल्या २५ वर्षांपासून मी या भागात कणीस विकते. लायन्स पॉईंट तसेच शिवलिंग पॉईंट बंद असल्याने गेल्या महिन्याभरापासून आमची उपासमार सुरू आहे, असे आदिवासी भागातील रहिवासी ताराबाई पवार यांनी सांगितले. आतवण गाव दुर्गम भागात आहे. त्या तुलनेत कुरवंडे गावातील अनेकांना आयएनएस शिवाजी या नौदलाच्या प्रशिक्षण संस्थेत नोकरी मिळाली आहे. रोजगार बंद असल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला, असे दशरथ टाकवे यांनी सांगितले.

वादाचे कारण

लायन्स पॉईंट भागात पर्यटकांना जादा दराने खाद्यपदार्थाची विक्री केली जात होती. छुप्या पद्धतीने हुक्का तसेच दारू विक्री  सुरू होती. वनविभाग तसेच पोलिसांना पैसे देऊन काहीजण अवैध व्यवसाय सुरू करत होते. या भागात दिखाव्यापुरती कारवाई झाली. पुन्हा अवैध व्यावसायिकांनी त्यांची पाळेमुळे रोवली. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला लायन्स पॉईंट बदनाम झाला. आतवण निसर्ग परिसर या नावाने या भागाची देखभाल होत होती. या जागेवर कुरंवडे गावातील ग्रामस्थांनी हक्क सांगितला. ग्रामस्थांना आधिक दुकाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यातून वादाला तोंड फुटले. त्यातून हाणामाऱ्या झाल्या. अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने वनविभागाने ऐन पावसाळ्यात लायन्स पॉईंट बंद केला.