राज्य सरकारमधील बहुतांश निर्णय आणि अतिमहत्वाच्या बैठका पुणे स्टेशन येथील नवीन शासकीय विश्रामगृहात होत असतात. अनेक नेते मंडळीचा राबता या ठिकाणी असतो. या वास्तूच्या आवारात म्हणजे नवीन शासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या आतील डाव्या बाजूस असणाऱ्या झाडाखाली बिअर आणि दारुच्या बाटल्याचा खच पाहायला मिळतो आहे. त्यामुळे बाटल्याच्या मागचे तळीराम कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे स्टेशन येथील नवीन शासकीय विश्रामगृह या ठिकाणी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी कामानिमित्त येत असतात. या इमारतीच्या आवारात सर्व सामान्य नागरिकाला प्रवेश घेणे फारच जिकिरीचे असते. प्रवेश मिळालाच तर कोणी बोलवले काय काम आहे? या प्रवेशद्वारावरील पोलिसांच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. एवढी सक्षम यंत्रणा असताना या परिसरात दारुच्या बाटल्या कुठून आल्या ? तसेच या बाटलीचे खरे तळीराम कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  व्यसनामुळे राज्यात अनेक संसार उध्दवस्त होण्याच्या घटना  घडताना दिसतात. असे असताना शासकीय इमारतीतील भोंगळ कारभारामुळे दिव्याखालीच अंधार असल्याचे स्पष्ट होत आहे. या तळीरामांचा शोध घेऊन योग्य कारवाई होईल का? हा मोठा प्रश्नच आहे.