X

साहित्यसंमेलन वर्षांआड घेण्यास हरकत काय? – प्रा. द. मा. मिरासदार

गेल्या काही वर्षांतील अध्यक्षांपैकी काही अपवाद वगळले तर वाङ्मयीन कर्तृत्व आहे असे सगळय़ांच्या बाबतीत सांगता येत नाही. काहींच्या वाङ्मयीन कर्तृत्वाबाबत प्रश्नचिन्हच आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन म्हटले, की वादविवाद, खर्चाचे आकडे हे पाहून डोळे दिपून जातात. अनेकदा अध्यक्ष हुडकावे लागतात. गेल्या काही वर्षांतील अध्यक्षांपैकी काही अपवाद वगळले तर वाङ्मयीन कर्तृत्व आहे असे सगळय़ांच्या बाबतीत सांगता येत नाही. काहींच्या वाङ्मयीन कर्तृत्वाबाबत प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे दरवर्षी संमेलन घेण्यापेक्षा भविष्यात वर्षांआड संमेलन घेण्यास हरकत काय, असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी बुधवारी उपस्थित केला. चांगल्या लेखकांचा शोध घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल, अशी मिस्कील शैलीत टिप्पणीही त्यांनी केली.
आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाने आणि प्रभावी कथाकथनाने गेली सहा दशके वाचकांच्या मनावर गारुड निर्माण केलेले प्रा. मिरासदार गुरुवारी (१४ एप्रिल) ९०व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने ही भूमिका मांडताना त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या सुरात सूर मिसळला. आता फारसे लेखन होत नाही. आनंदी असणं हा स्वभावाचा भाग आहे. दु:खं सगळय़ांच्याच वाटय़ाला येतात, पण त्यानं रडत कशाला बसायचं? हास्य हा जीवनाचा गाभा आहे, असे मिरासदार यांनी सांगितले. नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्वचित प्रस्तावना लेखन करतो. त्यासाठी पुस्तक मात्र आवर्जून वाचतो, असेही त्यांनी सांगितले. अनुवादित साहित्याच्या वाचनामध्ये सध्या भरपूर वेळ जातो. एरवी मी हे साहित्य वाचलेच नसते, असेही त्यांनी सांगितले.
विनोदी लेखन करण्यासाठी साधना असावी लागते. सध्या ज्या पद्धतीचे लेखन होत आहे त्यातून विनोदाला दर्जा राहिला आहे, असे दिसत नाही या मताशी मी सहमत आहे. पण, असा काळ साहित्याच्या जीवनातही येत असतो. शेतीमध्ये रान पडीक ठेवावे लागते तसे साहित्याचे रान पडीक राहिले तरी बिघडत नाही, पण हा काळ संपल्यावर चांगले लेखक निर्माण होतील याबाबत मी आशावादी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
वयाच्या या टप्प्यावर आयुष्यात थोडेफार करता आले याचे समाधान असले तरी बरेच काही करायचे राहून गेले ही चुटपुट आहे. मध्यंतरी चित्रपट कथा-पटकथा लेखनामध्ये गुंतल्यामुळे विनोदी कादंबरी आणि विनोदी नाटक लिहिण्याचे राहून गेले. ‘भिकूचं लग्न’ या कादंबरीचे कथानक तयार होते. दोन प्रकरणेही लिहून झाली होती, पण पुढे ते पूर्ण करायचे राहिले. एखादा विषय मनात पूर्ण झाला तर तो कागदावर उतरतो. ती प्रक्रिया आपल्यालाच पटली नाही तर ते काम पूर्ण होत नाही. मी सांगितलेल्या साहित्यिकांच्या आठवणी जावईबापूंनी (रवींद्र मंकणी) ध्वनिमुद्रित करून ठेवल्या आहेत, असेही मिरासदार यांनी सांगितले.
असहिष्णुतेचा कांगावा
असहिष्णुता हा सध्याचा परवलीचा शब्द झाला आहे, पण ती पूर्वीपासूनच आहे. औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून मशीद बांधली. हिंदूंची सहिष्णुता वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली. सत्तेशिवाय राहणे ज्यांना अशक्य होत आहे तेच हा कांगावा करीत आहेत. मोदी सरकार चांगले काम करीत आहे. त्यांना वेळ द्यायला हवा. बदल एका रात्रीत होत नसतात हे ध्यानात घ्यायला हवे, असेही मिरासदार यांनी सांगितले.

23
READ IN APP
X