सुशीलकुमार शिंदे यांचे मत

शब्द हे तलवारीचे काम करतात. त्यामुळे शब्दांच्या तलवारीची पूजा करून संस्कृतीचे जतन करायला हवे. समाजातील वाईट, घाण दूर करून देशाला पुढे नेण्याचे काम साहित्याचे आहे. समाजव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यामध्ये साहित्याने योगदान दिले आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले.

[jwplayer r33reeos]

गुरू गोिवदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून सरहद संस्थेतर्फे आयोजित पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात शिंदे बोलत होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, संमेलनाध्यक्ष डॉ. सुरजितसिंग पातर, माजी आमदार उल्हास पवार, वात्रटीकाकार, भारत देसडला, संजय नहार, संतसिंग मोखा, रवींद्रपालसिंग सेहगल या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ बलबीरसिंग सिचेवाल आणि डॉ. जसपाल सिंग यांना विश्व पंजाबी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानतर्फे डॉ. पातर यांना संत नामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र आणि पंजाब यांचे वीरता आणि प्रेमाचे नाते आहे. या संमेलनामुळे हे नाते आणखी दृढ झाले आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, अण्णा हजारे हे आधुनिक गांधी आहेत. त्यांनी मोठे आंदोलन उभे केले. त्या कालखंडात मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. अण्णांनी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करता आली याचे समाधान आहे.

हजारे म्हणाले, आंदोलन हे माझे एकटय़ाचे काम नाही. मंदिरात राहणारा फकीर असे काम करू शकत नाही. मला तर बँक खातेदेखील माहीत नाही. आंदोलनाची प्रेरणा मला साहित्यातून मिळाली. पूर्वी एकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता. मात्र, हाती आलेल्या साहित्याच्या वाचनातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. यापुढील आयुष्य समाजाच्या सेवेसाठी हे निश्चित केले. मी घरी गेलो नाही त्यालाही आता ४५ वर्षे झाली. कुटुंबातील भावाच्या मुलांची नावे मला माहीत नाहीत. माझ्याकडे झोपण्यासाठी पलंग आणि भोजनासाठी ताट-वाटी एवढीच मालमत्ता आहे. त्यामुळे  लखपती आणि करोडपती यांच्यापेक्षा मी सुखात आहे. आपण जन्म रडत घेतो, पण तेव्हा घरातील लोक आनंदाने हसत मिठाई वाटतात. आपण जेव्हा जाऊ तेव्हा हसत जाऊ आणि लोक रडतील, असे काम करूनच जगाचा निरोप घेऊ. पंजाबी भाषा बादशहाने नाही तर, पातशहांनी वाचविली. गुरू आणि सुफींनी जतन केली. त्यामुळे या भाषेच्या समृद्धीसाठी होत असलेल्या या संमेलनाला सरकारची मदत लाभली नाही हे चांगलेच झाले असे सांगून पातर म्हणाले, पंजाब हा केवळ भौगोलिक प्रदेश नाही तर, एक प्रेमाची अनुभूती देणारा प्रांत आहे.

[jwplayer VwmkQGEJ]