Advertisement

डिजिटल फॉन्टमधील पुलंच्या अक्षरलेखनाची जादू

वर्षभरात ३५ हजारांहून अधिक साहित्यप्रेमींकडून डाउनलोड

वर्षभरात ३५ हजारांहून अधिक साहित्यप्रेमींकडून डाउनलोड

पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या डिजिटल फॉन्टमधील अक्षरलेखनाची जादू कायम असल्याची प्रचिती आली आहे. वर्षभरात ३५ हजार १६३ साहित्यप्रेमींनी डिजिटल फॉन्टमधील पुलंचे हस्ताक्षर डाउनलोड केले असून हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ‘बी बिरबल’ या समाजमाध्यमातील संस्थेने पुलंच्या हस्ताक्षराच्या डिजिटल फॉन्टची निर्मिती केली होती. पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षी १२ जून रोजी ‘पुलं १००’ ((PuLa100) या फॉन्टचे अनावरण करण्यात आले होते. वर्षभरात ३५ हजार १६३ साहित्यप्रेमींनी हा फॉन्ट डाउनलोड केला असल्याची माहिती ‘बी बिरबल’ संस्थेचे संस्थापक संचालक गंधार संगोराम यांनी दिली.

गंधार संगोराम म्हणाले,‘ ३५ हजार जणांना मराठी फॉन्ट डाउनलोड करून तो वापरावासा वाटणे ही खूप मोठी घटना आहे. अर्थात त्याला कारणीभूत फक्त पुलं आणि पुलंच आहेत. आमचा त्यामध्ये खारीचा वाटा आहे. या फॉन्टचे अनावरण झाल्यानंतर सुरुवातीच्या आठ-दहा दिवसांमध्ये अनेकांचे दूरध्वनी, संदेश आणि ई-मेल आले. पुलंच्या प्रेमापोटी सगळे भरभरून बोलतात आणि त्यांचे हस्ताक्षर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतात याचा आनंद वाटतो. वाचन कमी होत असल्याचे म्हटले जात असताना एवढय़ा लोकांनी प्रतिसाद देणे ही एक चांगली खूण आहे असे मला वाटते.’

पुलंच्या हस्ताक्षराचा डिजिटल फॉन्ट डाउनलोड करून घेण्याची सुविधा आजन्म उपलब्ध राहणार आहे. संगणकावर टाईप केलेला मजकूर पुलंच्या हस्ताक्षरामध्ये दिसू शकतो. माझे नाव पुलंच्या हस्ताक्षरात कसा दिसेल हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय असतो. अनेक डिझायनरने हा फॉन्ट वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापरला आहे. हा फॉन्ट www.bebirbal.in/pula100 या संकेतस्थळावरून विनामूल्य डाउनलोड करता येईल.

 

21
READ IN APP
X
X