पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी मतदार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे ५९ हजार ४२१ आणि १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत ६ नोव्हेंबपर्यंत होती. दरम्यान, मतदार यादी निरंतर अद्ययावत करण्याची तरतूद असल्याने १ जानेवारी २०२० पासून पुन्हा नव्याने मतदार यादीत नाव दाखल करण्याची संधी पात्र मतदारांना उपलब्ध असणार आहे.

पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले, तरीही संबंधित मतदारांना मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तसेच यापुढील प्रत्येक निवडणुकीसाठी देखील नव्याने मतदार म्हणून नावनोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबपर्यंत नावनोंदणी करण्याची मुदत होती. मात्र, पुणे विभागातील पाचही जिल्ह्य़ांमधील मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे नोंदणी झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पदवीधर, शिक्षक मतदार संघांच्या निवडणुका जुलै २०२० मध्ये होणार आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२० पासून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. ३० नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना मतदार म्हणून अर्ज करता येणार आहे. परिणामी ६ नोव्हेंबपर्यंत अर्ज न केलेल्या मतदारांना १ जानेवारीनंतर अर्ज करता येणार आहेत.

दोन्ही मतदारसंघात नोंदणी कमी

सन २०१४ मध्ये झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी अनुक्रमे एक लाख ६२ हजार २१३ आणि ४७ हजार ६४ मतदार होते.

यंदा पदवीधरसाठी ५९ हजार ४२१ आणि शिक्षक मतदारसंघासाठी १८ हजार ७१४ मतदारांनी नोंदणी केली आहे.

पदवीधरसाठी गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल एक लाख दोन हजार ७९२, तर शिक्षक मतदारसंघात २८ हजार ३५० एवढय़ा संख्येने मतदार घटले आहेत.

१ जानेवारी २०२० पासून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

पदवीधर मतदारसंघ मतदारयादी कार्यक्रम

प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी २३ नोव्हेंबर

दावे, हरकती २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबपर्यंत

२६ डिसेंबरला दावे, हरकतींबाबत निर्णय

मतदार यादीची प्रसिद्धी ३० डिसेंबर