दिवसभर पर्यटकांची वर्दळ असूनही प्रयत्नपूर्वक टिपलेली अजिंठा लेण्याची शांत रूपे आणि लाकडी स्टुलांवर चढून, अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर आणि कोणत्याही विशिष्ट प्रकाशाविना टिपलेली लेण्यातील जगप्रसिद्ध चित्रांची छायाचित्रे पाहण्यास पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार आणि संशोधक प्रसाद पवार यांनी ही छायाचित्रे टिपली आहेत.
प्रसाद पवार फाऊंडेशन आणि अजिंठा रीसर्च रीस्टोरेशन सोसायटी यांच्यातर्फे बालगंधर्व कलादालनात ‘अत्त दीप भव’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन २० ऑगस्टपर्यंत सुरू असून केवळ छायाचित्रे पाहण्याचीच नव्हे तर प्रसाद पवार यांच्या तोंडून प्रत्येक छायाचित्राची जन्मकथा एकण्याची संधीही छायाचित्र रसिकांना मिळत आहे.
अजिंठामधील शिबिजातक कथेच्या छायाचित्रांमधील ६२ टक्के भाग काळाबरोबर पुसला गेला आहे. या चित्रांमधील काम पूर्ण पाहता यावे यासाठी पुसला गेलेला भाग डिजिटल छायाचित्रांमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. मूळ चित्रे वेगवेगळ्या चित्रकारांनी काढल्यामुळे त्यात दिसणारे फरक, चित्रांसाठी वापरलेले रंग याविषयीची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येत आहे. लेण्याचे समोरून काढलेले भव्य आकाराचे छायाचित्र व लेण्याच्या रचनेचे लहान मॉडेलही येथे पाहायला मिळते.   
गौतम बुद्धांच्या ध्यानस्थ मूर्तीचे सर्वोत्तम छायाचित्र मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न पवार यांनी उलगडले, पवार म्हणाले, ‘‘बुद्धांच्या मूर्तीच्या ध्यानसाधनेत सर्वोच्च अवस्थेस पोहोचलेल्या चेहऱ्याचे छायाचित्र हवे होते. मूर्तीवर विशिष्ट प्रकारे नैसर्गिक प्रकाश पडल्यानंतरच असे छायाचित्र मिळणार असल्यामुळे आम्ही ३६५ दिवस हव्या तशा प्रकाशासाठी मूर्तीवर सतत लक्ष ठेवत होतो.’’ बुद्धांच्या महानिर्वाण अवस्थेतील प्रसिद्ध मूर्तीचे समोरून काढलेले दुर्मिळ छायाचित्रही या प्रदर्शनात आहे.