पोलिसांकडून ११ काडतुसे जप्त

पुणे : आझाद हिंद एक्सप्रेसच्या डब्यातील कचरा टाकण्याच्या बादलीत एके-४७ रायफलची काडतुसे सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी एके-४७ रायफलची ११ काडतुसे जप्त केली आहेत.

आझाद हिंद एक्सप्रेस कोलकाता ते पुणे दरम्यान धावते. सोमवारी कोलकात्यातून आलेली आझाद हिंद एक्सप्रेस स्वच्छतेसाठी घोरपडीतील रेल्वेच्या यार्डात लावण्यात आली. त्यातील एका डब्याची सफाई करत असताना कचरा पेटीत एके-४७ रायफलची सात जिवंत काडतुसे आढळून आली तसेच आणखी चार काडतुसेही सापडली.

या घटनेची माहिती स्वच्छता विभागाच्या व्यवस्थापकांनी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) अधिकाऱ्यांना  दिली. पुणे लोहमार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

आझाद हिंद एक्सप्रेसच्या डब्यात सापलेली ११ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांनी दिली.