मानाच्या गणपतींपासूनच दोन मंडळांमध्ये पडत गेलेले अंतर, पोलिसांची बघ्याची भूमिका आणि कार्यकर्त्यांचा मिरवणूक लांबविण्याकडे असलेला कल यामुळे यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणूक तब्बल २८ तास ३० मिनिटांनी संपली. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेली मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजता संपली आणि गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. पुढच्या वर्षी लवकर या… म्हणत पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मुठा नदीवरील विविध घाटांवर मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे गुरुवारी दुपारी चार वाजून २० मिनिटांनी, तर दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मूर्तीचे पाच वाजून ४० मिनिटांनी विसर्जन झाले. यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचे संध्याकाळी सहा वाजून ३३ मिनिटांनी, चौथा तुळशीबाग गणपती मंडळाचे सहा वाजून ५० मिनिटांनी आणि पाचवा केसरीवाडा गणपती मंडळाच्या मूर्तीचे सात वाजून २० मिनिटांनी विसर्जन झाले.
रात्री उशीरा बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभागी झालेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या मूर्तीचे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता तर अखिल मंडई मंडळाच्या मूर्तीचे सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या मूर्तीचे शुक्रवारी सकाळी सात वाजून ४७ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीन वाजता रास्ता पेठेतील समर्थ मित्र मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीतील हे शेवटचे मंडळ होते.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा गुरूवारी मोठ्या दिमाखात पार पडला. पुण्याच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या ढोलताशांच्या गजरातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकांनी शहरातील रस्ते नेहमीप्रमाणे गजबजून गेले होते. राज्याच्या अन्य भागांप्रमाणे पुण्यातही पावसाने हजेरी लावली होती. मात्र, पुणेकरांनी नेहमीच्या उत्साहाने गणरायाला निरोप दिला. गुरुवारी सकाळी बेलबाग चौकात मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीने विसर्जन सोहळ्याचा उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी रस्त्यांवर अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पारंपारिक वाद्यांच्या व गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणुकीस सुरूवात झाली. यावेळी ज्ञानप्रबोधनीचे शिस्तबद्ध ढोल पथक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
चौकाचौकात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने पालखीतून काढण्यात आली. तसेच श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूकही चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. श्री गुरुजी तालीम मंडळाने मिरवणुकीसाठी तयार केलेला फुलांचा भव्य रथ लक्षवेधी ठरला. श्री तुळशीबाग मंडळाचाही रथ प्रेक्षणीय झाला होता. कसबा गणपतीचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग आणि सर्वात शेवटी केसरीवाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, कँटोन्मेट बोर्डचे भाजप नगरसेवक विवेक यादव यांच्यावर विसर्जन मिरवणुकीत करण्यात आलेल्या गोळीबारामुळे पुण्यातील विसर्जन सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागले. या हल्ल्यात बंदुकीची गोळी विवेक यादव यांच्या तोंडाला चाटून गेली आहे. सध्या त्यांच्यावर रूबी रूग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी याप्रकरणी दोघाजणांना ताब्यात घेतले आहे.