‘जायका’कडून ८,७०० कोटी मिळणार; प्रकल्पाच्या कामाला वेग

शहर आणि जिल्ह्य़ातील वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे) प्रस्तावित अंतर्गत बाह्य़वळण वर्तुळाकार मार्ग (इंटर्नल रिंगरोड) बनविण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरिता तब्बल १७ हजार ४१२ कोटी एवढा खर्च येणार असून त्याकरिता रस्त्याभोवती नगररचना योजना (टाऊन प्लॅनिंग स्कीम- टी पी स्कीम) राबविण्यात येणार आहे. त्याबरोबरच जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) आठ हजार सातशे कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे.

प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या १२९ कि. मी. वर्तुळाकार रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) तयार करण्यात आला असून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा पाचशे मीटरच्या अंतरामध्ये नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता बारा गावांमधील जमीनधारकांशी संवाद साधण्यात येत आहे. त्यांच्या संमतीने भूसंपादन केल्यानंतर नगररचना योजनांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार आहे.

अंतर्गत वर्तुळाकार रस्ता हा सातारा, सोलापूर आणि नगर महामार्गामधून जाणार असून या मार्गावर तीन बोगदे, उड्डाणपूल तर, वडकी येथे स्थानक (जंक्शन) उभारण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत येवलेवाडी, हांडेवाडी, वडकी, उरुळी देवाची, वडाची वाडी, होळकरवाडी, औताड-हांडेवाडी येथे नगररचना योजना करण्यात येणार आहे. दोनशे हेक्टर म्हणजेच पाचशे एकर जागेमध्ये नियोजित नगररचना योजना प्रस्तावित आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

वर्तुळाकार रस्त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जायकाकडे पाठविण्यात आला असून त्यााला पुढील वर्षी मान्यता मिळेल. मात्र, जायकाचे कर्ज मंजूर होईपर्यंत प्राधिकरणाकडून क्रेडिट ट्रेडिंग करून बँकांकडून एक हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. याबरोबरच प्राधिकरण स्वत:चा निधीही प्रकल्पांसाठी खर्च करणार आहे.

प्राधिकरण व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार

सुमारे १७ हजार ४१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यासाठी ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नगररचना योजनेच्या माध्यमातून प्राधिकरणाला मिळणाऱ्या वाणिज्यिक विकासाला योग्य अशा जमिनी भाडेतत्त्वावर देऊन आणि त्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या परताव्यातून वर्तुळाकार रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतरापर्यंत चार चटई क्षेत्रावर प्रीमिअम आकारला जाणार आहे. त्या माध्यमातून संपूर्ण नगर रचना योजनेच्या उभारणीचा खर्च व वर्तुळाकार रस्त्यासाठी लागणारा खर्च उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला बीज भांडवलापोटी प्राधिकरण व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.