स्थानिक नगरसेवकांची मागणी; सभेपुढे प्रस्ताव

हलाखीच्या परिस्थितीमुळे पिंपरीतील एचए कंपनीपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. कामगारांच्या वसाहतीतील मूलभूत सुविधांची कामे

करण्याची कंपनीची ऐपत राहिली नसल्याने महापालिकेने खर्च करावा व त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद वर्ग करण्याची मागणी तीन नगरसेवकांनी केली आहे. त्यानुसार, येत्या सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका अमिना पानसरे, काँग्रेसचे नगरसेवक सद्गुरू कदम यांनी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठकीत मांडलेला याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यास अंतिम मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या २० सप्टेंबरच्या सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

या बाबतची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक अरुण बोऱ्हाडे यांनीही स्वतंत्रपणे केली आहे. एचए कंपनीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. कंपनीच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कामगारांसाठी असलेली वसाहत खराळवाडी प्रभागात येते. या ठिकाणी आवश्यक सेवासुविधांची वानवा आहे. कंपनीकडे पैसे नसल्याने ती कामे करता येत नाहीत, त्यामुळे ही कामे महापालिकेने करावीत, अशी मागणी आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. सांडपाण्याची गळती होत असून, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अंतर्गत भागातील डांबरीकरण होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या कामांसाठी महापालिकेने ५० लाख रुपये तरतूद वर्ग करून द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव सभेपुढे आहे.