News Flash

आघाडीचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर- तटकरे

अजित पवार म्हणाले, नोटाबंदीबाबत पवार साहेबांनी सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (संग्रहित फोटो)

नोटाबंदीच्या अंमलबजावणी विरोधात ९ जानेवारीला राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन

नोटाबंदी निर्णयाच्या अंमलबजावणी विरोधात पक्षातर्फे ९ जानेवारी रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी येथे केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी आघाडी करेल. मात्र, आघाडी करण्याबाबतचा निर्णय जिल्हा स्तरावर स्थानिक पदाधिकारी व पक्षाचे प्रभारीच घेतील, अशीही माहिती तटकरे यांनी दिली.

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांसदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, प्रवक्ते नबाब मलिक, खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, नोटाबंदीबाबत पवार साहेबांनी सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट केली आहे. निर्णयाची अंमलबजावणी करत असताना सरकारने तयारी केली नसल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर रिझव्‍‌र्ह बँकेचीही विश्वासार्हता कमी झाली आहे. निर्णयाला पन्नास दिवस होत आहेत तरीही नागरिकांचे हाल सुरूच आहेत. ग्रामीण भागात तर भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे पक्षातर्फे ९ जानेवारीला राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. समविचारी पक्ष आंदोलनात सहभागी झाल्यास त्यांचे स्वागत करू.

तटकरे म्हणाले, राज्यातील पक्षाचे सर्व प्रभारी, खासदार, आमदार, पदाधिकारी यांच्याशी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल, आगामी येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात चर्चा झाली. प्रत्येक ठिकाणची स्थानिक पातळीवरील स्थिती वेगळी असते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत जिल्हा स्तरावर पदाधिकारी आणि पक्षाचे प्रभारीच निर्णय घेतील. निवडणुकांनंतर आघाडी करण्याबाबतचा निर्णय निवडणुकांचे निकाल पाहून घेतला जाईल.

पुण्यातही होणार इनकमिंग

पिंपरी-चिंचवडप्रमाणेच पुण्यातदेखील इतर पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत. मात्र, इतर पक्षांतील पदाधिकारी पक्षात घेताना त्यांचे चारित्र्य, समाजमानसातील काम पाहूनच त्यांना प्रवेश दिला जाईल. पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तीन टप्प्यांत जाहीर केली जाईल. शहरातील सुमारे साडेतीनशे आरक्षणे भाजपच्या आमदारांनी बदलली आहेत, असे माझ्या कानावर आले असून कागदपत्रे हातात आल्यानंतरच त्यावर बोलेन, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खासदार काकडे धंदेवाईक माणूस

एखाद्या पक्षाचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर सत्तेबरोबर राहणारी आणि स्वत:ची कामे करून घेणारी काही धंदेवाईक माणसे असतात. पुण्यात अशी बरीच माणसे आहेत. त्यापैकी एक म्हणजे खासदार संजय काकडे. काँग्रेसचे सरकार असताना काकडे सहयोगी म्हणून त्या पक्षात होते, आता भाजपचे सरकार आहे म्हणून ते त्या पक्षात दिसत आहेत. आगामी काळात केंद्रातून भाजपचे सरकार गेल्यानंतर ज्या पक्षाचे सरकार येईल, त्या पक्षात तुम्हाला काकडे दिसतील. – अजित पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 4:33 am

Web Title: local ncp workers will decide alliance with congress says sunil tatkare
Next Stories
1 ‘आयटी हब’मध्येही मेट्रो
2 काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3 पोलीस ठाण्यांमध्ये ‘निमविधी स्वयंसेवक’
Just Now!
X