अंतर्गत रस्ता असल्याचा सोसायटय़ांचा दावा

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील सहारा हॉटेल परिसरातील दोन गृहनिर्माण सोसायटय़ांनी वहिवाटीचा रस्ता अडवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी के ला आहे. तसेच हा रस्ता महापालिके च्या विकास आराखडय़ांतर्गत (डीपी) विकसित करण्यात आल्याचा दावाही स्थानिक नागरिकांनी के ला असून हा रस्ता तातडीने सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिले आहे. तर, संबंधित रस्ता सोसायटय़ांचा अंतर्गत रस्ता असल्याचे सोसायटीधारक सांगत आहेत.

सेनापती बापट रस्त्यावरील सहारा हॉटेल परिसरात लक्ष्मी आणि विश्रामबाग या दोन गृहनिर्माण संस्था आहेत. नुकताच हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे. या रस्त्यावरून पुढे दुर्गानगर भागाकडे जाण्यासाठी स्थानिक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रस्ता सिमेंटचा करण्यात आल्यानंतर दोन्ही सोसायटय़ांनी दोन्ही बाजूंनी हा रस्ता अडवला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी जाळ्यांचे सुरक्षाफाटक बसवण्यात आले आहे. या ठिकाणी हा रस्ता सोसायटीच्या मालकीचा असून इतर नागरिकांना हा रस्ता वापरण्यास मनाई असल्याचे फलकही लावण्यात आले आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिक सचिन माळवदकर यांनी दिली.

पालिकेच्या विकास आराखडय़ात हा रस्ता प्रस्तावित आहे. त्यानुसार या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच पथदिवे, इतर सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. हा रस्ता दुर्गानगरकडे किं वा तेथून सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून वापरण्यात येतो. करोना काळाचा फायदा घेऊन दोन्ही सोसायटय़ांनी हा रस्ता बंद के ला आहे. पायी चालत जाण्यासही सुरक्षारक्षकांकडून मज्जाव करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते नीलेश निकम यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले असले, तरी अद्याप रस्ता खुला झालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे, असेही माळवदकर यांनी सांगितले.

संबंधित रस्ता सोसायटीचा अंतर्गत रस्ता असून तो बंद करण्यात आलेला नाही. करोनामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची नोंद ठेवली जात आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांनी नोंदणीसाठी थांबावे म्हणून तात्पुरते अडथळे (बॅरिके ड्स) बसवण्यात आले आहेत. कोणात्याही नागरिकाला अडवण्यात येत नाही.

– संदीप बाविस्कर, लक्ष्मी सोसायटी

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने सोसायटय़ांनी पोलीस प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून हा रस्ता बंद के ला आहे. सोसायटय़ांनी लोखंडी फाटक बसवून रस्ते बंद के ल्याने हा रस्ता खुला करावा आणि स्थानिक नागरिकांची अडवणूक होऊ नये, असेही कळवले आहे.

– दिनकर गोजरे, कार्यकारी अभियंता पथविभाग