पिंपरी-चिंचवडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून एका महिलेच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत एक महिण्याचं रेशन देऊ केलं आहे. त्यामुळे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोहिदास बोऱ्हाडे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर रत्ना उपेंद्र विश्वकर्मा अस मदत केलेल्या महिलेचे नाव आहे.

करोनाचं संकट अवघ्या जगभरात पसरलं आहे. सर्वात जास्त फटका इतर देशांना बसला असून याचा प्रादुर्भाव भारतात देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान, करोनामुळे देशात आता तिसऱ्या टप्प्यात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रत्ना यांचे पती उपेंद्र विश्वकर्मा हे मिळेल ते काम करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरतात. रत्ना या शुक्रवारी प्रसूत झाल्या. मात्र, लॉकडाऊनमुळं त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांच्या या बिकट परिस्थितीबाबत एक मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. त्यानुसार, या महिलेला कोणत्याच रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करून घेण्यात येत नव्हते.

व्हॉट्सअॅपवरचा हा मेसेज पोलीस कर्मचारी बोऱ्हाडे यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा संभाव्य खर्च टाळून या कुटुंबाला रेशन भरुन दिले. त्यानंतर रत्ना यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. या ठिकाणी त्यांची शुक्रवारी प्रसूती झाली असून त्यांना गोंडस बाळं झालं आहे. तसेच रुग्णालयात जाऊन रत्ना यांना बोऱ्हाडे यांनी मदतीचा धनादेशही दिला.

एका गरीब कुटुंबाला किमान एक महिना जगता येईल एवढं सहकार्य एका पोलीस कर्चचाऱ्याकडून करण्यात आल्यानं त्यांच्या समाजिक जाणिवेचं अनेक स्तरातून कौतूक होत आहे.