करोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून हजारो लोक याचे बळी ठरले आहेत. भारतातही याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १४ तारखेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, तरीही नागरिक घराबाहेर पडतच आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बाळासाहेब अहिवळे हे दुचाकीवरून करोनामुळं इतर देशांची काय अवस्था झाली आहे. याबाबत जनजागृती करताना ‘अरे बाबांनो, आता तरी घरी बसा’ अशा शब्दांत घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन लोकांना करीत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने प्रशासनासह, विविध संघटना रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. त्यांच्याबरोबरीने पुण्यातील बाळासाहेब अहिवळे हे दुचाकीवरून नागरिकांमध्ये प्रबोधनाचे काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “मी घोरपडे पेठेत राहत असून बूट पॉलिशचे काम करून उपजीविका भागवतो. मला गायनाची देखील आवड असून आमच्या भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी होत असतो. या कार्यक्रमांतून काही पैसे मिळतात आणि आता हीच आवड मला करोनाबाबत जनजागृती करण्यात प्रोत्साहन देत आहे.”

“शहरातील विविध भागात जगभरात सध्या या विषाणूमुळे काय परिस्थिती उद्भवली आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरातील अनेक भागात मी दुचाकीवरून जातो, तेव्हा अनेक लोक मला रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हे पाहून वाईट वाटते, त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी ‘अरे बाबांनो, आता तरी घरी बसा’ हे सांगण्याचे काम करीत आहे. आता जर लोकांनी ऐकले नाही तरी खूप कठीण परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने घरी बसून करोना विषाणूला परतून लावण्याचे आवाहन केले आहे.

पुणे पोलिसांकडून कौतुक

पुणे शहरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही भाग सील करण्यात आला आहे. दरम्यान, नाना पेठ परिसरात बाळासाहेब अहिवळे हे दुचाकीवरून नागरिकांमध्ये प्रबोधन करीत होते. तेवढ्यात पोलिसानी त्यांना पाहताच बोलावून घेतले आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले. यावर वाहतूक पोलीस उपायुक्त संजय शिंदे म्हणाले, ‘प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत असताना समाजातील अनेक नागरिक प्रशासनासोबत येऊन काम करीत आहेत. ज्या प्रकारे दुचाकीवरून बाळासाहेब अहिवळे समाजात प्रबोधनाचे काम करीत आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.