भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पत्रकारपरिषदेद्वारे विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी या पुढच्या काळात लॉकडाउन झेपणार नाही. संसर्ग रोखण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करावी लागेल, असं देखील सांगितलं.

मराठा  आरक्षणा संदर्भात म्हणाले…
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, तोपर्यंत ओबीसींना मिळणाऱ्या सर्व सवलती मराठा समाजाला देण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला होता. विद्यार्थांचे शुल्क भरले होते. मात्र यावर्षी हे सरकार काय करणार माहीत नाही. आरक्षणाची केस महाराष्ट्र सरकारने ताकदीने चालवावी. कुठल्याच परिस्थितीत स्टे मिळायला नको. या विषयात सरकारने विरोधी पक्षाला सोबत घ्यावे, चर्चा करण्यात गैर वाटून घेऊ नये.

वडेट्टीवार यांनी राजीनामा देऊन काय होणार –
पुण्यात हातावर पोट असलेल्या लोकांना एक महिन्यासाठी नोकरी देणार, सारथीची स्वायत्तता परत देणार, असं आश्वासन सरकारने दिलं होतं, त्याचं काय झालं? असे प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला उद्देशून केले. वडेट्टीवार म्हणाले की, मी राजीनामा देणार. त्यातून काय होणार? त्यापेक्षा रचनात्मक काहीतरी करा. सारथी प्रश्न मार्गी लावा.

फडणवीस यांना करोनाची भीती नाही का? –
फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरत आहेत. त्यांना काय करोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडतच नाहीत. आतापर्यंत दोनदा बाहेर पडले. मातोश्रीवर देखील ते कुणाला भेटायला तयार नाहीत, असं कसं चालेल. असेही आमदार चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.