लोहगडावरील लेण्यात प्राचीन जैन शिलालेख सापडला

मावळ तालुक्यातील किल्ले लोहगडाच्या कडय़ातील एका प्राचीन लेणीवजा पाण्याच्या टाक्यावर सुमारे २१०० वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे.  ब्राह्मी लिपीतील हा शिलालेख प्राचीन तर आहेच, पण ‘णमो अरिहंताणम्’ असा उल्लेख असलेला महाराष्ट्रातील हा केवळ दुसरा शिलालेख ठरला आहे.

An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

लोहगडावर किल्लय़ाच्या उंच कडय़ात काही ठिकाणी लेणी कोरलेली आहेत. लोहगडाच्या कडय़ात काही ठिकाणी लहान समूहात लेणी असून या समूहात पाण्याच्या काही टाक्या खोदलेल्या आहेत. या लेणी नेहमीच्या वाट मार्गापासून तुटलेल्या असल्याने तेथे सहजगत्या पोहोचता येत नाही. किल्ले लोहगडावरील काही प्राचीन लेण्यांना भेट देताना पुण्यातील गिर्यारोहक विवेक काळे, डॉ. अभिनव कुरकुटे, अमेय जोशी, साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के आणि अजय ढमढेरे यांना गडाच्या पूर्वेच्या कडय़ात असलेल्या लेणी आणि पाण्याच्या मोठय़ा टाक्यावर एक शिलालेख आढळून आला. लोहगडाच्या पायथ्याच्या लोहगडवाडी समीप गडाच्या उंच कडय़ात, जमिनीपासून काही मीटर उंचीवर असलेल्या पाण्याच्या मोठय़ा टाक्यावर हा शिलालेख कोरलेला आहे.

लोहगडच्या कडय़ातील लोहगडवाडीचा हा लेणी समूह आणि तेथील शिलालेखाचा अभ्यास आणि वाचन डेक्कन कॉलेजमधील कला-इतिहास आणि पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ. श्रीकांत प्रधान यांनी केले आहे. डॉ. अभिनव कुरकुटे आणि विवेक काळे यांनी शिलालेखाच्या वाचनात सहभाग घेतला. शिलालेख अंदाजे ४० बाय ५० सेंटीमीटर आकारमानाच्या सपाट पृष्ठभागावर कोरलेला असून ब्राह्मी लिपीत आहे. सहा ओळींच्या या लेखाची  सुरुवात ‘णमो अरहंताणम्’ या जैन धर्मीयांच्या मंगलाचरणाने होते. लेखातील दात्याचे नाव ‘भदंत इदरखित’ असून, लेखात त्याने दिलेल्या पोढी म्हणजे पाण्याच्या टाक्यासह इतर काही गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. लेखात नमूद केलेल्या गोष्टी बहुधा समूहातील  लेण्यांशी असाव्यात. ‘णमो अरहंताणम्’ असे मंगलचरण असलेला पश्चिम महाराष्ट्रातील हा दुसरा प्राचीन शिलालेख आहे. या पूर्वी ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एच. डी. सांकलिया आणि डॉ. शोभना गोखले यांना पाले गावच्या (ता. मावळ) डोंगरात इसवी सनपूर्व पहिल्या शतकातला महत्त्वाचा दान लेख सापडला होता.

शिलालेखाची वैशिष्टय़े

पाले आणि लोहगड अशा दोन्ही शिलालेखांमधील आणखी एक साम्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी दान देणाऱ्या व्यक्तीचे नाव ‘इदरखित’ म्हणजे इंद्ररक्षित असे आहे. शिलालेखाचा काळ पाहता या दोन्ही लेखांमध्ये नमूद केलेली व्यक्ती एकच असावी. एकाच दात्याने लोहगडच्या आणि पाले येथील लेणींसाठी दान दिले असावे. बहुदा हा लेणी समूह महाराष्ट्रातील जैन धर्माच्या, इतिहासाच्या तसेच प्राचीन जैन लेणी स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. लवकरच लोहगडच्या या महत्त्वाच्या शिलालेखावर, तेथे असलेल्या लेण्या आणि इतर पुरातत्त्वीय अवशेषांवर विस्तृत शोधनिबंध प्रसिद्ध होणार असल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले.