पिंपरी : शिरूर मतदारसंघातील रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयात सनईच्या मंगलमय सुरांनी सोमवारी मतदारांचे स्वागत करण्यात आले. नयनरम्य रांगोळी आणि ठिकठिकाणी फुगे बांधून मतदान केंद्राची सजावट करण्यात आली होती. मतदान करून खोलीबाहेर पडलेल्या मतदारांना छायाचित्र काढण्यासाठी खास ‘सेल्फी पॉईंट’ करण्यात आला होता. तर, तुळशीचे रोप देऊन महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यात येत होते.

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी मतदान केंद्राची सजावट केली होती. रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालय, निगडी येथील माता अमृतानंदमयी विद्यालय, भोसरी येथील राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, तसेच आळंदी येथील एका विद्यालयाच्या मतदान केंद्राची मंडप उभारून आणि फुगे बांधून सजावट करण्यात आली होती. गुलाब पुष्प आणि तुळशीचे रोप देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले. उन्हाचा तडाखा ध्यानात घेऊन मतदारांना पिण्यासाठी थंड पाण्याची सोय करण्यात आली होती. रुपीनगर येथील ज्ञानदीप शाळेमधील मतदान केंद्रावर मतदान करुन आल्यानंतर लोकशाही उत्सवाचे छायाचित्र काढण्यासाठी खास ‘सेल्फी पॉईंट’ तयार केला होता.

मतदान करुन आल्यानंतर मतदारही सेल्फी काढण्याची संधी घेत होते. शाळेतील सर्व शिक्षक मतदान केंद्रावर मतदारांना मदत करत होते. निगडी ओटास्किम येथील महापालिकेच्या शाळेमधील मतदान केंद्रामध्ये शाळेतील काही मुला-मुलींचे गट तयार करुन मतदारांना केंद्राची माहिती देण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर बसविले होते.

मतदार याद्यांचा घोळ

भोसरी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रामधील मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे भलत्याच मतदान केंद्रामध्ये गेली होती. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पतीचे नाव एका मतदान केंद्राच्या मतदार यादीमध्ये, तर पत्नीचे नाव दुसऱ्याच मतदान केंद्राच्या मतदार यादीमध्ये असल्याचे आढळून आले. त्यामुळे मतदारांची मतदान करण्यासाठी धावपळ होत होती. काही मतदारांची नावे, तर काहींचे छायाचित्र चुकीची छापली गेल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले, अशा तक्रारी आल्या.