|| मुकुंद संगोराम

आता पुणे महापालिकेतील सर्व नगरसेवक पालिका प्रशासनाला बोल लावणार. मैलापाणी वाहून नेणाऱ्या आणि रस्त्याखालून जाणाऱ्या वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी नीट साफसफाई केली नाही, म्हणून त्यांच्यावर आरोप करणार. पण हे काम केले किंवा नाही, हे आपण कधीच तपासले नाही, हे मात्र नाही सांगणार. कुठे काम झालेच असेल, तर स्वत: जातीने उभे राहून ते होतंय की नाही, याची खातरजामा केली नाही, हेही नाही सांगणार. पण पालिका प्रशासन मात्र पुण्यात खूपच पाऊस पाडणाऱ्या वरुणराजावर सगळे काही ढकलणार. एवढा पाऊस पडेल, हे माहीत असतं तर केलंच असतं की नियोजन, असंही सांगणार. पण पुण्यातून वाहणाऱ्या नाल्यांवर बांधकामांना आपणच परवानगी दिली आहे, हे नाही सांगणार. मैलापाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या साफच केल्या नाहीत, असंही नाही म्हणणार. आपण सारे पुणेकर रस्त्यात दिसेल तिथे प्लास्टिकच्या पिशव्या न लाजता टाकणार. नाल्यामध्ये वाट्टेल तेवढा कचरा टाकणार. नदीपात्रात राडारोडा टाकणार. पण बोल मात्र पालिकेला लावणार.

अवघ्या एक तासाच्या पावसात पुण्याची अशी दैना होते आणि सारे शहर वेठीला धरलं जातं आणि सगळ्या यंत्रणा ढिम्मपणे हताश होऊन निष्क्रिय होतात, हे पुणेकरांच्या भाळी लिहिलेलं आहे. या यंत्रणा राबवणाऱ्या कोणालाही कशाचीही लाज, शरम वाटत नाही, हा कायमचाच अनुभव. पाणी वाहून गेलं, की सगळं जैसे थे होतं आणि आपण रोजच्या जगण्याच्या रगाडय़ात गुंतून जातो. जीवनमानाचा इतका नीचांकी दर्जा असणाऱ्या या शहराबद्दल खरंच कुणाला मनापासून कळकळ आहे का, असा प्रश्न सतावत राहतो आणि त्याचे उत्तर मात्र मिळत नाही. मागच्या पिढय़ांनी या शहराचं जे मातेरं केले, त्याची फळे भोगतो आहोत, असं म्हणावं, तर आताचे कुठे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत?

ऐन पावसात रस्त्यांवर एकाच जागी दोन दोन तास वाहनांवर किंवा वाहनांमध्ये बसून राहणाऱ्या सगळ्यांना आपण मूर्ख आहोत, असे वाटते आहे. पावसाची एवढी दहशत यापूर्वी कधीच वाटली नव्हती, असं म्हणताना, सगळे रस्ते सिमेंटचे करण्याचा जो धोशा या सगळ्या नगरसेवकांनी लावला आहे, त्यामुळे या त्रासात भर पडते आहे, हे आपण लक्षातही घेणार नाही. सिमेंटीकरणामुळे रस्त्यांवर पाणी साचून राहते. त्यातून रस्ता दुभाजकांमुळे ते पलीकडच्या बाजूसही जाऊ शकत नाही. या रस्त्यांच्या कडेला पाणी वाहून जाण्याची पन्हाळी न ठेवण्याचा गाढवपणा निराळाच. पादचारी मार्ग रुंद करण्याच्या बिनडोक नियोजनाविरुद्ध कुणी ब्रही नाही काढणार. रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात वाहने येतात, याचं कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय ढिसाळपणे चालवली जाते आहे, याबद्दल जाबही नाही विचारणार आणि या सगळ्या कृष्णकृत्यांमध्ये भ्रष्टाचार एवढा समान धागा दिसत असतानाही, राजकारण्यांच्या भयावह भीतीने, आपल्या तोंडचे पाणी पळणार. हे सगळं किती काळ सहन करणार आहोत आपण?

जिथे तिथे बेकायदा हेच कायदेशीर अशी नीती अमलात येताना दिसत असूनही आपण सगळे मूग गिळून गप्प बसतो. नद्यानाल्यांची पात्र अरुंद करून त्यावर इमले बांधणारे नामानिराळे राहतात पण रस्त्यांवर भर पावसात तुंबून राहिलेल्या पाण्यात जीव मुठीत धरून कधी एकदा घरला पोचतो, या विवंचनेत सगळे जण तासनतास उभे मात्र राहतात. पुण्यात शंभर मिलीमीटर पाऊस पडला, तर एवढा हाहाकार उडतो. उद्या दोनशे मिलीमीटर पडला, तर काय प्रचंड हाल होतील, याच्या कल्पनेनेही अंगावर शहारे येतील सगळ्यांच्या. दूरदृष्टीचा अभाव आणि ढिसाळपणा यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत पन्नास जणांना मृत्यू आला. याबद्दल एकानेही साधी दिलगिरीही मागण्याचं सौजन्य दाखवलेलं नाही. इतका निर्ढावलेपणा मुरलेले सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या हाती आपलं सगळ्यांचं आयुष्य सुरक्षित राहील, अशी शक्यता आता उरलेली नाही.

mukund.sangoram@expressindia.com