मुकुंद संगोराम mukundsangoram@expressindia.com

प्रचंड गाजावाजा करून बीआरटी (बस रॅपिड ट्रान्सपोर्ट) हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील उपक्रम जवळजवळ बंद करून टाकण्याचा पुणे महानगरपालिकेचा डाव केवळ मूर्खपणाचाच नव्हे तर शहराच्या विकासावर दीर्घकालीन विपरीत परिणाम करणारा आहे. पुण्यात नव्याने अवतरणारी मेट्रो रुळांवरून धावण्यास आता काही महिन्यांचाच अवधी राहिलेला असताना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा आणि उपयुक्त उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर जाणे हे शोचनीय आहे.

पुणे शहराच्या विकासासमोर सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न कोणता, याचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. गेल्या सहा-सात दशकांत पुणे महानगरपालिकेने त्याबाबत जे शेण खाल्ले आहे, त्याला इतिहासात तोड नाही. दुप्पट आकाराच्या मुंबईसारख्या प्रचंड  शहराने ज्या दर्जाची आणि वेगाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण केली, ती पाहून आपणही काही धडा घ्यावा, असे या शहरातील एकाही नगरसेवकाला आजवर कधीही वाटले कसे नाही, याचे आश्चर्य वाटते. आश्चर्य अशासाठी की केवळ वाहतूकच नव्हे, तर पुण्याच्या विकासाबद्दल जराही दूरदृष्टी नसलेल्या अशा नगरसेवकांना आजवर पुण्यातील सगळ्या मतदारांनी निवडून कसे दिले?

पुण्यातील पूर्वीची पीएमटी आणि आताची पीएमपीएल ही बससेवा ही पुण्याची सर्वात गंभीर समस्या आहे. ती नागरिकांनी स्वत:च सोडवून टाकली आणि या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून न राहता स्वत:च्या मालकीची वाहने खरेदी करून टाकली. त्यामुळे पुण्यातील लोकसंख्येपेक्षा येथील वाहनांची संख्या जास्त झाली. त्यामुळे वाहन उद्योगाची चांदी झाली, पण पुण्यातील अरूंद रस्त्यांवरील वाहनांची गर्दी मात्र वाढतच चालली. हे असे मुद्दाम झाले, की चुकून, या वादात पडण्याचे कारण नाही. परंतु ही चूक दुरुस्त करण्याचेही भान आजतागायत कुणालाही येऊ नये, हा केवळ निर्लज्जपणा झाला. त्यामुळेच कोटय़वधी रुपये खर्चून सुरू केलेला बीआरटीचा उपक्रम गुंडाळणे हा शहाणपणाचा मार्ग निश्चितच नाही.

एकीकडे पीएमपीएलसाठी रस्तोरस्ती बसथांब्यांवर नागरिक ताटकळलेले दिसतात, तर दुसरीकडे रस्ते रुंदीकरण जवळजवळ ठप्प झाले आहे. तिसरीकडे वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंगरोड) रुंदीला कात्री लावली जात आहे. हे सगळे अदूरदृष्टी असल्याचे पुरावे आहेत. पुण्यातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहताच कामा नये, यासाठीच केलेला हा आटापिटा आहे. गेली बारा वर्षे स्वतंत्र मार्ग असलेली बीआरटी धावते आहे. त्या स्वतंत्र मार्गातून अनेक खासगी वाहने सतत धावत आहेत. गंमत म्हणजे बारा वर्षांनंतरही बीआरटी प्रायोगिक तत्त्वावरच सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या कित्येक वर्षांत रस्त्यांचे रुंदीकरण मोठय़ा प्रमाणात होत नसल्याने आणि उलट आहेत तेच रस्ते सुभोभीकरणाच्या नावाखाली अरूंद केले जात असल्याने या रस्त्यांवर रोज वाहतूक कोंडी होते आहे आणि त्याबद्दल एकाही लोकप्रतिनिधीला जराही दु:ख वाटू नये, हे भयावह आहे.

शहराचा विकास प्रचंड वेगाने होईल, याची पुसटशीही कल्पना नसणाऱ्या अदूरदर्शी नगरसेवकांनी गेल्या काही दशकांत जे निर्णय घेतले, त्याची फळे आपण भोगतो आहोत. वर्तुळाकार रस्त्याची रुंदी ११० मीटरऐवजी ९० मीटर करण्याने आत्ता दोनशे कोटी रुपये वाचतील हे खरे असले, तरी काहीच वर्षांत हा नव्वद मीटरचा रस्ताही अपुरा पडेल, हे आजच्या लोकप्रतिनिधींना समजत कसे नाही? घरोघरी डबेडुबे देण्यासाठी नागरिकांनी भरलेल्या करातून कोटय़वधी रुपयांची उधळण करणाऱ्या नगरसेवकांना रस्तारुंदीसाठी निधी उपलब्ध करून देताना मात्र खिशातले पैसे जात असल्यासारखे दु:ख होते. हे सगळे कसे काय थांबणार?