मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

गेल्या वर्षी २५ सप्टेंबरला आंबिल ओढय़ाला पूर आला आणि कात्रज ते सिंहगड रस्ता या संपूर्ण परिसराला पुराने अक्षरश: वेढले. एक वर्ष पूर्ण होत असताना, मागील वर्षी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, या प्रश्नाचे उत्तर ‘काहीही नाही’, असे आहे. या शहरातील सगळ्या नगरसेवकांना याबद्दल जराही चाड नाही, याचा पुणेकरांना कितीही राग आला, तरीही त्याचा काहीही उपयोग नाही. कारण हा कोणाचाच पहिला अनुभव नाही. ज्या शहरातल्या लोकप्रतिनिधींना आपल्या नागरिकांच्या जिवाची जराही काळजी नाही, ते शहर आणखी किती खड्डय़ात जाणार, एवढेच पाहणे आता उरले आहे. पानशेतचे धरण फुटल्यानंतर झालेला हाहाकार पुण्याच्या विकासाला गती देणारा ठरला. त्यावेळी सरकारने आणि पालिकेनेही ज्या गतीने पुनर्वसनाचे काम केले, त्याला तोड नाही.

तरीही नंतरच्या काळात पेठांमधले पुणे एकदम चहूबाजूंनी विकसित होऊ लागले. कोथरूड, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज या परिसरात नव्याने मोठय़ा प्रमाणात बांधकामे होऊ लागली. टुमदार बंगल्यांच्या वसाहतींमध्ये काही काळाने उंच इमारती उभ्या राहू लागल्या. पण ज्या वेगाने शहर वाढले, त्या वेगाने सुधारणा काही झाल्या नाहीत. ज्यांनी आयुष्यभराची पुंजी एकत्र करून या भागात घरे घेतली, त्यांना गेल्या वर्षांपासून अनेक रात्री सुखाची झोप लागू शकलेली नाही. घराच्या दारातून पाणी वेगाने आपल्या घराच्या आत येत असताना हतबल झालेल्या या नागरिकांच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी त्यावेळी ऐटीत सगळ्यांनी आश्वासनांची खैरात केली.

तुमचे सगळे नुकसान भरून देऊ, तुमच्या संरक्षक भिंती परत बांधून देऊ ही आणि अशी खंडीभर आश्वासने नगरसेवकांनी दिली. आपल्याला कुणी वाली आहे, अशा मूर्ख समजात या भागातील नागरिक काही काळ निश्चिंत झाले. पण नंतर या सगळ्यांना कुठून आपण इथे राहायला आलो, असे वाटू लागले. ज्या गुरुराज सोसायटीची भिंत बांधून देण्याचे तोंड फाडून आश्वासन दिले गेले, त्याच सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावणारे मूर्ख महाभाग पुणे महानगरपालिकेत अजूनही जिवंत आहेत. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. कारण नागरिकांच्या बाजूने त्यांच्याबरोबर भांडणाऱ्या नगरसेवकांचे त्या पालिकेतील संवेदनशून्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशीच सूत असते. हे असले निर्ढावलेपण सामान्यांचे जगणे हराम करणारे.

आज एक वर्ष पूर्ण होत असताना काय दिसते? जिवाच्या आकांताने त्या रात्री आपली वाहने वाहून जाताना पाहणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना पण विमा कंपन्यांनी मदत केली. राज्य शासनाने जाहीर केलेल्या तुटपुंज्या मदतीचा काही अंशही मिळाला. पण पुणे महानगरपालिकेने मात्र निर्लज्जपणे डोळ्यावर कातडे पांघरून बसण्याचा पवित्रा घेतला. हे सारे अतिशय भयंकर आणि चीड आणणारे आहे. मात्र त्याबद्दल कोणीही स्वत:ला उत्तरदायी मानत नसल्याने कात्रज ते दत्तवाडी या प्रचंड मोठय़ा परिसरातील नागरिक  हतबल झाले आहेत. ज्या सोसायटय़ांच्या सीमाभिंती बांधून देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते, तीच पालिका आता सोसायटय़ांना स्वखर्चाने या सीमाभिंती बांधून घ्यायला सांगत आहे.

पालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असेल, तर कोणत्या तोंडाने हे सगळे नगरसेवक हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा आग्रह धरत आहेत? कोणत्या तोंडाने आपापल्या प्रभागात अनावश्यक अशी रंगरंगोटीची आणि देखाव्याची कामे करत आहेत? या कामांवर खर्च करताना त्यांना गेल्याच वर्षी झालेल्या प्रचंड नुकसानीची जराही आठवण होऊ नये? अशा निर्लज्जपणाला ज्या मतदार नागरिकांनी उत्तर द्यायचे असते, त्यांनी आता बाह्य़ा सरसावून पुढे यायला हवे. नगरसेवक हे कोणी देवदूत नसतात. त्यांना लोभ, हाव अशा रोगांनी पछाडलेलेच असते. पण आपण नगराचे सेवक आहोत, असा आव आणून ते नागरिकांच्या डोळ्यातील पाण्याचाही लिलाव करण्यास पुढेमागे पाहात नाहीत, हे सर्वानी ध्यानात ठेवावे.

काम केले नाही, तर नगरसेवकांना परत बोलावण्याचा अधिकार मिळवण्यासाठी आता नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी आंदोलन करायला हवे. अन्यथा असे कितीतरी पूर येतील.. कितीतरी घरे, वाहने, सीमाभिंती वाहून जातील, कित्येकांचे प्राण जातील.. पण पुढे काहीच होणार नाही.