||  मुकुंद संगोराम

माडगूळकर, तुम्ही आठवडाभरात शंभरी पुरी कराल. तुमची शताब्दी गेल्या वर्षी मोठय़ा उत्साहात सुरू झाली. वर्षभर तुमच्या गीतांचे, कवितांचे अनेकानेक कार्यक्रम साऱ्या राज्यभर झाले. तुमची आठवण होत नाही, असा एक दिवस जात नाही. नव्याने उदयाला आलेल्या व्हॉट्स अ‍ॅप विद्यापीठात रोज तुमच्या कवितांचा जागर सुरू असतो. त्या कविता, गीतं एकमेकांना पुढे ढकलण्यासाठी हजारोंची बोटं आसुसलेली असतात. तुम्ही मराठी मनाचं चराचर व्यापून टाकलंयत माडगूळकर. गदिमा ही तीन अक्षरं आमचं सुखनिधान आहेत. तुमचं शब्दवैभव हे आमचं संवादाचं साधन आहे. गदिमा,  तुमचं वेगळं भिंतींचं स्मारक कशाला हवंय आता?

पुणे ही तुमची कर्मभूमी. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर असलेली तुमची ‘पंचवटी’ ही बंगली एकेकाळी अख्ख्या पुण्याचं आकर्षण होती. जनामनांत लोकप्रिय असलेली अनेक लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांचा तो गप्पांचा अड्डा असायचा. महाराष्ट्राचे पॉल म्युनी म्हणजे राजा परांजपे, बाबूजी म्हणजे सुधीर फडके आणि तुमची गट्टी याच पुण्यात झाली. चित्रपटासारख्या रंगीबिरंगी दुनियेत राहूनही तुम्ही शब्दांच्या साम्राज्यातच राहिलात. तुम्हाला त्या दुनियेतले छक्के पंजे समजून घेण्यात रस नव्हता. कारण तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची साद अधिक महत्त्वाची वाटत होती. किती किस्से आणि किती दंतकथा तुमच्या नावावर इतकी दशके आम्ही ऐकत आलो आहोत माडगूळकर! ख्यातनाम लेखक पु. भा. भावे आणि तुमची मैत्री किती प्रगाढ होती, याचे किस्से रंगवून रंगवून ऐकलेत आम्ही. रात्री उशिरापर्यंत तुमची गप्पांची मैफल रंगत आली, म्हणून तुम्ही त्यांना घरी सोडायला चालत चालत गेलात, तरी गप्पा संपल्या नाहीत, म्हणून पुभा पुन्हा तुमच्या घरापर्यंत तुम्हाला सोडायला आले.. असं ऐकलंय आम्ही. असे कितीतरी किस्से आम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असतो. सांगत असतो. कशाला हवंय तुमचं स्मारक?

तुमच्या साहित्यिक जीवनातील सर्वात मोठा प्रसंग ‘गीतरामायणा’चा. तोही याच पुण्यात घडला. पहिल्याच गीताच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी तुम्ही आणि बाबूजींचं झालेलं भांडण, मग तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवून काही वेळातच तुम्ही लिहिलेलं गीत आणि लगेच त्याचं झालेलं प्रसारण.. एखाद्या चित्रपट निर्मात्यांनं सक्काळी घरी येऊन गीतं लिहून द्यायची घातलेली गळ आणि तुम्ही चुटकीसरशी त्याच्या हातात ठेवलेली गीतं.. पुण्याच्या साहित्य संमेलनात तुमच्या कवितेमुळे गुदरलेला कठीण प्रसंग. किती किती गोष्टी आहेत तुमच्या माडगूळकर. तुमच्या शब्दकळेवर भाळलेले आणि त्यामुळे भारलेले कितीतरी लोक अजून जिवंत आहेत. अगदी साधं, सुबोध आणि तरीही काव्यात्म अशा तुमच्या लेखनाची पारायणं झालीयेत. शंभरी पुरी करत असताना तुम्हालाही आतून खूप समृद्ध असल्याचं जाणवत असेल नाही! पैसे किती मिळाले, त्यातले किती कशावर खर्च झाले..यांसारख्या व्यावहारिक जगण्याशी तुमचा कधीच संबंध नव्हता. असताच, तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होतात, तेव्हाच करून ठेवली असतीत, तुमच्या स्मारकाची तरतूद. पण नाही केलीत ते बरंच झालं. तुमच्या निधनानंतर तुमच्या अंत्यदर्शनासाठी झालेली अलोट गर्दी  पुण्यानं फार क्वचित पाहिलीये. तुमचं स्मारक लोकांच्या हृदयात कधीच बांधून पूर्ण झालंय.. आता नका धरू हट्ट पुण्याच्या महापालिकेकडे, तुमच्या स्मारकासाठी.

हट्ट तुमचा नव्हताच कधी. आमचाच होता. स्मारकं पुढच्या पिढीसाठी असतात. तुमची आठवण टिकवून ठेवण्यासाठी असतात. त्या शेक्सपिअरचं स्मारक बघा. रोज हजारो जण ते पाहायला जातात. तुमच्या कविता आणि गाणी लाखो मराठी मनं सतत गुणगुणत असतात माडगूळकर! काळजीच नको, तुम्हाला तुमच्या शब्दांची. ते सुखरूप आहेत, आमच्याकडे. सुखातही आहेत. चिंता नका करू. तुमचं स्मारक हा आता राजकीय विषय झालाय. प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जाहीर होणाऱ्या जाहीरनाम्यात तुमच्या स्मारकाचा आवर्जून उल्लेख करतात. ते लगेचच पुरं करण्याच्या शपथा पण घेतात. मतं मिळवायला तुमचं स्मारक खूप उपयोगी पडतं

सगळ्यांना. माहिताय ना तुम्हाला माडगूळकर? अशी अनेकांची स्मारकं झालीयेत पुण्यात.. भिंतींची. काही होत नाही तिथं. जळमटं साठतात, पुण्यतिथी किंवा जन्मतिथीच्या दिवसापर्यंत. तेवढा दिवस साजरा होतो. पुन्हा ती स्मारकं कुलूपबंद राहतात.

पुण्याच्या पालिकेला तुमच्याबद्दल केवढा तरी आदर आहे माडगूळकर!  तुमच्या स्मारकासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात चांगली ‘घसघशीत’ अशी ‘पंचवीस लाखां’ची तरतूदही करून ठेवलीये. स्वतंत्र ‘बजेट हेड’च केलंय तुमच्या स्मारकाचं. तुमच्या शंभरीत तरी ते होईल, असं वाटलं होतं अनेकांना. पण आता इच्छा असली तरी विधानसभेच्या निवडणुकीमुळे लागू झालेली आचारसंहिता आड आलीये. अहो खड्डय़ातले रस्तेही आता दुरुस्त नाही करता येणार. तेव्हा पुन्हा काही काळ थांबावं लागेल कदाचित. या राजकारण्यांच्या सगळ्या तऱ्हा तुम्हाला माहीत असताना कशाला हवंय ते स्मारक अन् बिरक. सोडून द्या माडगूळकर. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहात तुम्ही. तुमच्या शब्दांनी आमचं जगणं संपन्न होत आलंय.. एवढं पुरेसं नाही का?